मालवणात रात्रीच्या वेळी होणाऱ्या अनधिकृत वाळू वाहतुकीला महसूलचा “सपोर्ट”

शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवून अधिकाऱ्यांकडून स्वतःचे खिसे गरम करण्याचे प्रकार : मनसेचा आरोप

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यात रात्रीच्या वेळी होणाऱ्या अनधिकृत वाळू वाहतुकीला महसूल विभागाचा सपोर्ट असल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष सागर जाधव यांनी केला आहे. शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडवून अधिकाऱ्यांकडून स्वतःचे खिसे गरम करण्याचे प्रकार होत असून फक्त दिखाव्यासाठी एखादी कारवाई करून “तू रडल्यासारखं आणि मी मारल्यासारखं” असे प्रकार केले जातात. अगदी खालपासून वरपर्यंत मलिदा पोच झाला की महसूल प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

काल रात्री भरधाव वेगात अवैध वाळू भरून गोव्याच्या दिशेने निघालेला डंपर पलटी होऊन अपघात झाला. हे भरधाव वेगाने अवैध वाळू घेऊन राजरोसपणे कोणालाही न जुमानता रात्रीच्या वेळी वाहतूक करतात. गेल्या ५ वर्षाहून अधिक काळ अधिकृत वाळू उपसा बंद आहे. तरीही कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसून बुडवून त्याबदल्यात अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून अवैधरित्या वाळू काढून त्याची वाहतूक केली जाते. भरधाव वेगात चालणाऱ्या डंपरमुळे याआधी अनेक अपघात झाले आहेत. आणि यात निष्पाप लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याबद्दल कोणीच काही बोलत नाही. तरी हे अवैध वाळू वाहतुकीचे प्रकार प्रशासनाने वेळीच थांबवावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रकार कसे थांबवावेत हे नक्कीच जाणते, असा इशारा देऊन लवकरच या प्रकाराबद्दल आपण जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तालुक्यातील तहसीलदार, मंडळ अधिकारी तसेच तलाठी यांच्या चौकशीची मागणी करणार आहोत, असे सागर जाधव यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!