मालवणवासियांचे मल्टीप्लेक्सचे स्वप्न अद्याप दूरच…

बसस्थानकातील मल्टीप्लेक्सच्या कामाचा अद्याप आराखडाच नाही, अन् निधीही नाही ; भाजपा पदाधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात धक्कादायक माहिती उघड

२०१९ पासून वैभव नाईक नागरिकांना मल्टीप्लेक्सची खोटी आश्वासने देत असल्याचे झाले स्पष्ट : बाबा मोंडकर यांची प्रतिक्रिया

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणच्या नागरिकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध होण्यासाठी शहरात होत असलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत छोटेखानी मल्टिप्लेक्स उभारण्यात येणार असल्याचे सातत्याने आमदार वैभव नाईक यांच्याकडून सांगण्यात येत होते. मालवणच्या बस स्थानकाचे काम सध्या सुरू असून त्यामुळे लवकरच मल्टिप्लेक्स देखील शहरवासीयांच्या सेवेत उपलब्ध होण्याची अपेक्षा नागरिकांना होती. मात्र मालवणवासियांचे मल्टिप्लेक्सचे स्वप्न अद्याप दुरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा पदाधिकाऱ्यांनी बुधवारी या इमारतीला भेट दिल्यानंतर मल्टिप्लेक्स बाबत संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली असता इमारतीच्या पहिल्या टप्प्यात मल्टिप्लेक्सच्या कामाचा कोणताही समावेश नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. या कामासाठी अद्याप कोणत्याही स्वरूपाच्या निधीची तरतूद देखील झालेली नाही, अशी माहिती यावेळी उपलब्ध झाली. तत्कालीन आमदार वैभव नाईक हे मागील पाच वर्षे मल्टिप्लेक्सच्या नावाखाली येथील नागरिकांची दिशाभूल करत होते हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष बाबा मोडकर यांनी यानिमित्ताने केला आहे.

मालवण बसस्थानकाच्या इमारतीची दुरावस्था झाल्याने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात बस स्थानकाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. याठिकाणी मल्टीप्लेक्सची इमारत देखील दाखवण्यात आली होती. त्यामुळे मालवणवासियांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध होण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र मागील पाच वर्ष बस स्थानकाचे काम रेंगाळले. नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने मालवण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मालवण बस स्थानकाला भेट देऊन ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. यावेळी मल्टिप्लेक्स कामासंदर्भात विचारणा केली असता मालवण बस स्थानक इमारतीच्या पहिल्या टप्प्यात मल्टिप्लेक्स कामाचा समावेशच नसल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मल्टिप्लेक्स होऊ शकते. मात्र अद्यापपर्यंत या कामासाठी कोणत्याही स्वरूपाचा निधी अथवा शासन मान्यता मिळालेली नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. त्यामुळे मागील पाच वर्षे मालवण शहरवासीयांना आमदार वैभव नाईक यांच्याकडून मल्टिप्लेक्सचे गाजर दाखवण्यात येत होते का ? असा प्रश्न भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी उपस्थित केला आहे. आगामी काळात जनतेच्या मागणीनुसार मल्टीप्लेक्स अथवा आवश्यक तो बदल याठिकाणी केला जाईल, अशी ग्वाही श्री. मोंडकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3863

Leave a Reply

error: Content is protected !!