मालवण बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाला गती ; डिसेंबर अखेरीस नवीन इमारत कार्यान्वित होणार

आ. निलेश राणेंच्या सूचनेनुसार भाजपा पदाधिकाऱ्यांकडून एसटी अधिकारी व ठेकेदारासमवेत पाहणी

तात्पुरत्या स्वरूपात महिलांसाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध होण्याकरिता पालिकेशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या मालवण बसस्थानकाच्या नूतनीकरण कामाला गती मिळाली आहे. आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार शहर भाजपाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी एसटी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासोबत चर्चा करून बस स्थानकाचे काम तातडीने पूर्ण झाले पाहिजे. या कामावर खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांचे विशेष लक्ष असून लवकरच मालवण दौऱ्यावर येणारे आ. निलेश राणे स्वतः याठिकाणी भेट देऊन आढावा घेणार असल्याचे शहर भाजपाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी सांगितले. येथील शौचालयाची अतिशय गंभीर अवस्था असून नवीन इमारती मधील शौचालय सुरु होईपर्यंत पालिकेशी संपर्क करून मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून घेण्याची सूचना भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली. बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर जानेवारी पासून जुनी इमारत पाडण्यास सुरुवात केली जाणार असून दोन महिन्यात ही नवीन इमारत कार्यान्वित केली जाईल, असे ठेकेदार राजेश बोकाडे यांनी सांगितले. 

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार मालवण शहर भाजपाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी बसस्थानकाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली. यामध्ये शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जगदीश गावकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण, दादा वाघ, संदीप मालंडकर, कमलाकर कोचरेकर आदिंसह एसटीचे अधिकारी, ठेकेदार राजेश बोकाडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी बस स्थानकाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना भाजपा पदाधिकाऱ्यांनी करून त्यासाठी निधी कमी पडत असेल तर त्याची पूर्तता करण्यासाठी पक्ष स्तरावर प्रयत्न केले जातील असे सांगितले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मालवण बसस्थानकासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र हे काम पूर्ण करून घेण्यात तत्कालीन आमदार वैभव नाईक यांना अपयश आल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आ. निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मतदार संघातून विजय मिळवल्यानंतर येथील रखडलेले प्रश्न आहेत, ते अग्रक्रमाने सोडवण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आज मालवण बसस्थानकाच्या अपूर्ण कामाला भेट दिली. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या इमारती साठी दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. पण आजपर्यँत या ठिकाणचे आमदार वैभव नाईक यांनी केवळ स्वतःची आर्थिक गणिते करून इमारतीवर दुर्लक्ष केले. आज भाजपाच्या वतीने या कामाची पाहणी करून काही सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या आहेत. त्यात डिसेंबर अखेरीस या इमारतीचे काम पूर्ण करण्यात येऊन जुनी इमारत धोकादायक असल्याने ती पाडण्याची सुचना करण्यात आली आहे. तसेच निदान महिलांसाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध करण्यासाठी पालिकेशी आजच पत्रव्यवहार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. काही दिवसात स्वतः खा. नारायण राणे, आमदार निलेश राणे येथील अपूर्ण कामांचा आढावा घेणार असे बाबा मोंडकर यांनी सांगून राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे अडकलेले मालवणचे बसस्थानक लवकरच लोकार्पणासाठी सज्ज असेल असे ते म्हणाले.

दरम्यान, माजी आमदार वैभव नाईक यांनी मालवण बस स्थानकात मल्टीप्लेक्स होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र बसस्थानकाच्या पहिल्या टप्प्यात मल्टीप्लेक्सच्या कामाचा समावेशच नसून त्यासाठी निधीची तरतूद देखील अद्याप नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वैभव नाईक खोटी आश्वासने देत होते, हे स्पष्ट झाले असून येणाऱ्या काळात जनतेच्या मागणीनुसार मल्टीप्लेक्स अथवा आवश्यक तो बदल केला जाईल, अशी ग्वाही श्री. मोंडकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3863

Leave a Reply

error: Content is protected !!