… तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा बेवारस होणार नाही : निलमताईंचा शब्द
मालवणात उत्स्फूर्त प्रतिसादात भाजपा महायुतीचा महिला मेळावा संपन्न
जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा व्यक्त केला विश्वास
मालवण | कुणाल मांजरेकर
२००९ मध्ये कमी वयात खासदार झालेल्या निलेश राणे यांचा त्यानंतरच्या दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला. या पराभवानंतर हे दुःख निलेश कुरवाळत बसला नाही. वडिलांचा पराभव झालेल्या कुडाळ मालवण मतदार संघातून आमदारकी लढवून वडिलांची हार पुसून काढण्याचा निर्णय त्याने घेतला. ही हार पुसून काढण्यासाठी मतदार संघातील महिलांनी निलेशला आपले मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत. 2014 नंतर या मतदार संघाला कोण वाली नव्हता, असं बोललं आहे होतं. पण जोपर्यत राणे कुटुंब आहे, तोपर्यंत असं होणार नाही. आतातर राणे साहेब खासदार आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी आमची असून हा मतदार संघ बेवारस होणार नाही, अशी ग्वाही सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. नीलमताई राणे यांनी मालवण कुंभारमाठ येथे आयोजित भाजपा महायुतीच्या महिला मेळाव्यात दिली.
दरम्यान, सर्वसामान्य जनतेचा विचार करून केंद्र व राज्य सरकार अनेक योजना आणत आहे. जनहीताला प्राधान्य देत हे सरकार काम करत आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अधिक गतिमान विकास साध्य करण्यासाठी खासदार राणेसाहेब प्रयत्नशील आहेत. यां सोबतच आता मालवण कुडाळचा विकासही निश्चितच गतिमान होईल. माता भगिनी व जनतेच्या आशीर्वादाने निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास देखील सौ. निलमताई राणे यांनी व्यक्त केला.
मालवण कुंभारमाठ येथील अथर्व मंगल कार्यालयात सौ. निलमताई राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. निलमताई राणे यांसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, बचत गट महिला अध्यक्षा प्रीती सावंत, गीता चौकेकर, मंगल तांबट, स्मिता लंगोटे, तन्वी सकपाळ यांसह भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, प्रांतिक सदस्या रश्मी लुडबे, माजी जि. प. अध्यक्षा सुमेधा पाताडे, अस्मिता बांदेकर, माजी सभापती मधुकर चव्हाण, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, आंबडोस सरपंच सुबोधिनी परब, कोळंब सरपंच सिया धुरी, प्रतिमा भोजणे, समीक्षा खोबरेकर यांसह मोठया संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी सौ. राणे म्हणाल्या, विकासकामे व जनतेची सेवा करताना निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मतदार संघ आदर्शवत असा घडवला जाईल. यासाठी निलेश राणे निश्चितच प्रयत्नशील राहतील. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, व्यापारी यांच्या समस्या सोडवून त्यांची प्रगती साध्य करत असताना येथील प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळाले पाहिजे. यासाठी माझीही आग्रही भुमिका त्यांच्याकडे राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर हे मोठया मताधिक्याने विजयी होतील. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. असा विश्वास सौ. निलम राणे यांनी व्यक्त केला.
महिला बचत गटांना मार्केट मिळवण्यासाठी माझे प्रयत्न
या कार्यक्रमात प्रस्ताविक करताना एका महिलेने निलेश राणे यांनी महिला बचत गटांच्या महिला भवनसाठी यापूर्वीच जागा उपलब्ध करून दिल्याचे म्हटले होते. त्या अनुषंगाने बोलताना नीलम राणे यांनी जोपर्यंत मालाला मार्केट मिळणार नाही, तोपर्यंत महिला सक्षम होणार नाहीत, असे सांगितले. गेली 15 ते 20 वर्षे झाली, बचत गटांना मार्केट मिळवण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत, असे त्या म्हणाल्या. यासाठी निलेश राणे यांचे देखील तुम्हाला सहकार्य मिळेल. आज सरकार वेगवेगळ्या योजना आणत आहे. याचा महिला वर्गाला लाभ मिळत आहे, असे नीलम राणे यांनी सांगितले.
यावेळी श्वेता कोरगावकर, सुमेधा पाताडे, अस्मिता बांदेकर यांनी मार्गदर्शन केले. विकासाचे व्हिजन असलेले संवेदनशील नेतृत्व असेलेले निलेश राणे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
गेल्या काही वर्षात निलेश राणे सातत्याने या मतदार संघात कार्यरत आहेत. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत आहेत. सोबतच शेकडो कोटींचा निधी त्यांनी या भागात सरकारच्या माध्यमातून आणला आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने जनता त्यांच्या सोबत ठाम असून त्यांचा विजय जनतेने निश्चित केला आहे, अशा भावना अशोक सावंत यांनी व्यक्त केल्या. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बचत गट महिला अध्यक्षा प्रीती सावंत व सहकारी यांच्या पुढाकारातून आयोजित यां मेळाव्यास महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी साळेल येथील काही महिलांनी भाजपात प्रवेश केला.