कार्यकर्ते आपली ताकद म्हणणारे नारायण राणे रणजित देसाईंच्या निवडणुकीवेळी कुठे होते ?
ठाकरे गटाचे प्रवक्ते मंदार केणींचा सवाल ; शहरातील कुडाळकर हायस्कुलच्या इमारतीवरही बोट
आ. वैभव नाईक हे किमान ३५ हजाराच्या मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास
मालवण : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत निलेश राणे हे कुडाळ मालवणमधून उभे असल्याने भाजपचे नेते खा. नारायण राणे हे स्वतः मालवणात तळ ठोकून आहेत. मुलाच्या विजयासाठी आपली सर्व यंत्रणा त्यांनी पणाला लावली आहे. नारायण राणे नेहमीच कार्यकर्ते हेच आपली ताकद असल्याचे सांगतात. मग मागील विधानसभा निवडणुकीत त्यांचे कार्यकर्ते रणजित देसाई रिंगणात असताना राणे परिवारातील कोणता सदस्य त्यांच्या प्रचारासाठी गावागावात फिरला ? आज आपल्या मुलासाठी घराघरात पोहोचणारे नारायण राणे यांनी देसाईंसाठी आपले योगदान का दिले नाही ? असा सवाल ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांनी मालवण मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, मालवण शहरातील कुडाळकर हायस्कुलच्या दुरावस्थेला राणे कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आमदार वैभव नाईक यांची निवडणूक जनतेने हाती घेतली असून त्यांच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता ते किमान ३५ हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास देखील मंदार केणी यांनी व्यक्त केला.
येथील ठाकरे शिवसेनेच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, रवी तळाशीलकर, तपस्वी मयेकर, मनोज मोंडकर, किशोर गावकर, उमेश चव्हाण, राका रोगे, निनाक्षी मेथर, भारती वाघ, चंदू खोबरेकर, सन्मेष परब, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते. यावेळी मंदार केणी म्हणाले, शहरातील अनेक विद्यार्थी घडवणारी आणि शैक्षणिक वारसा जपणारी डॉ. कुडाळकर हायस्कुल ही संस्था राणे कुटुंबाने ताब्यात घेत नवीन इमारत व दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्याच्या नावाखाली दुसरीकडे हलवली. या शाळेला आणि मुलांना वाऱ्यावर सोडण्याचे काम राणे कुटुंबाने केले आहे. या शाळेची दुरावस्था झाल्याने एक सेवाभावी संस्था आता ही शाळा चालवत आहे, असे ते म्हणाले.
राणे कुटुंब आज सुसंस्कृतपणाचा आव आणत आहे. मात्र शिव पुतळा दुर्घटनेवेळी उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नियोजित वेळेनुसार ते घटनास्थळी आले असताना नारायण राणे आणी त्यांचे समर्थक त्याठिकाणी येऊन त्यांना अडवण्याची भाषा करीत होते. त्यावेळी उबाठाच्या सैनिकांनी दाखवलेली ताकद पाहून राणे पिता पुत्रांनी मीडियासमोर पोलीस प्रशासनाला वापरलेली भाषा महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्यामुळे राणे समर्थकांनी वापरलेली भाषा आणि गोंधळ पाहून त्यांची प्रवृत्ती तीच आहे हे सिद्ध झाले असून केवळ निवडणूक समोर असल्याने सभ्यपणाचा आव त्यांच्याकडून आणला जात आहे, असा आरोप मंदार केणी यांनी केला.
शिवपुतळा दुर्घटनेतील प्रमुख आरोपीना सोडून शिल्पकार, आर्किटेक्ट, वेल्डर यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी सत्ताधारी पक्षा तील लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असल्याचा आरोप मंदार केणी यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे हिंदुत्व बेगडी असून ते जर शिवरायांचे हिंदुत्व मानणारे असते तर पुतळा दुर्घटनेतील आरोपींना त्यांनी सोडले नसते, असे मंदार केणी यांनी सांगितले.