नांदोस सारंगवाडी ते चव्हाणवाडी-समतानगर रस्त्याची दुरवस्था ; ग्रामस्थांकडून राजकीय पक्षाच्या नेत्यांना “नो एंट्री” ; मतदानावर बहिष्कार
गावात आल्यास काळ्या झेंड्यांनी स्वागत करणार ; “आम्हाला आश्वासन नको; आता प्रत्यक्ष कृती हवी” ग्रामस्थांची भूमिका
मालवण : मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडी मधील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेली दहा वर्षे गावातून जाणाऱ्या नांदोस सारंगवाडी ते चव्हाणवाडी-समतानगर या प्रमुख रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात ग्रामस्थ प्रशासन पातळीवर पाठपुरावा करत असूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात गुडघाभर पाण्यातून वाटचाल करावी लागते. मूलभूत सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या या त्रासामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर काळे झेंडे आणि निषेधाचे बॅनर लावून आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दशकभरापासून, पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा अडथळा येतो. पावसाळ्याच्या हंगामात, जून ते डिसेंबरपर्यंत हा रस्ता गुडघाभर पाण्याखाली असतो. विशेषतः मागासवर्गीय समाजातील चांभार आणि महार समाजाचे वृद्ध, लहान मुले, विद्यार्थी, तसेच आजारी व्यक्तींना हा एकमेव मार्ग पार करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अपघातांची मालिका या रस्त्यावर नेहमीचीच झाली आहे. मात्र कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा स्थानिक प्रशासनाने या समस्येवर ठोस उपाय केलेला नाही अशी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
या मतदार संघात गेली दहा वर्षे एकाच आमदाराची सत्ता असूनही, मागासवर्गीय वस्तीतील या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी कायम अपूर्ण राहिली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नागरिकांनी आपल्या निषेधात स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला मतांसाठी त्यांच्याकडे येण्याची परवानगी दिली जाणार नाही. यंदाच्या निवडणुकीत नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.
“आम्हाला आश्वासन नको; आता प्रत्यक्ष कृती हवी आहे,” असे स्पष्ट शब्दांत नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. यानंतर जर कुठलाही राजकीय नेता मतांसाठी या रस्त्यावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी करण्यात येईल आणि त्यांना तात्काळ परत पाठवले जाईल, असेही नागरिकांनी ठणकावून सांगितले आहे. निषेधाच्या या पावलामुळे स्थानिक प्रशासनाला या समस्येकडे लक्ष देण्यास भाग पाडण्यासाठी नागरिकांनी ठोस भूमिका घेतली आहे.
महार आणि चांभार समाजातील लोकांनी याबाबत जनजागृतीसाठी गावभेट घेण्याची तयारी सुरू केली आहे. समाजबांधवांना एकत्र आणून या समस्येविरोधात आवाज उठवण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. मतदानावर बहिष्कार घालून अन्यायाविरोधात एकजुट दाखवण्याचे उद्दिष्ट नागरिकांनी निश्चित केले आहे.
नांदोस सारंगवाडी ते चव्हाणवाडी-समतानगर रस्त्याची दुरवस्था केवळ प्रवासासाठी नव्हे, तर स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठीही एक मोठा धोका ठरली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलावी अशी नागरिकांची ठाम मागणी करत त्वरित कारवाईचे अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांनी केलेल्या इशाऱ्यानुसार, जर प्रशासनाने या समस्येचे त्वरित निराकरण केले नाही, तर या संतापाचा आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम होऊ शकतो.