मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर – नारायणाचा ऐतिहासिक पालखी सोहळा २ नोव्हेंबर रोजी
मालवण : शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर आणि नारायणाचा ऐतिहासिक पालखी प्रदक्षिणा सोहळा दीपावली पाडव्या दिवशी शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी होणार आहे
दुपारी १ वाजता रामेश्वर – नारायण पालखी देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिरातून निघून श्री देव नारायण, पावणाई, भावई, रामेश्वर, सातेरी देवी व गिरोबा मांड येथे सर्व देवतांना सांगणे करुन गावभेटीला व देवतांच्या भेटीला निघणार आहेत. ही पालखी आडवण मार्गे वायरी तानाजी नाका येथून भूतनाथ मंदिर येथे थांबेल. त्या नंतर समुद्र किनाऱ्यामार्गे मोरयाचा धोंडा येथे भेट देऊन दांडी येथील दांडेश्वर मंदिरात काही काळ थांबल्यानंतर पुन्हा किनाऱ्यामार्गे मेढा येथील श्री देवी काळबादेवी मंदिर व जोशी मांड येथे येईल त्याठिकाणी भेटीगाठी चा कार्यक्रम पार पडल्यानंतर पालखी बंदर जेटी मार्गे मालवण बाजारपेठेत प्रवेश करेल. यानंतर रात्री पालखी आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत पालखी सोमवार पेठेतील रामेश्वर मांड येथे दर्शनासाठी थांबेल. त्यानंतर बाजारपेठ, भरड मार्गे पुन्हा देऊळवाडा येथील मंदिरात पालखी मार्गस्थ होईल. तरी या पालखी सोहळ्याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी इत्यादी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.