शिंदे गटाचा कुडाळातील मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन : हरी खोबरेकरांची टीका

लोकसभा निकालानंतर जिल्ह्यात फोफाऊ पाहत असलेली राक्षसी वृत्ती कुडाळ मालवणची जनता वेशीबाहेर ठेवणार

प्रभू श्रीरामाचे शिवधनुष्य राणेंना पेलवता न आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ; शिवधनुष्य वैभव नाईकांनाच शोभून दिसते

मालवण : भाजपाच्या निलेश राणे यांच्या शिंदे गटातील प्रवेशावेळी कुडाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेला मेळावा म्हणजे बचत गटांचे स्नेहसंमेलन होते का ? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केला आहे. शिवसेनेचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद फक्त शिवसैनिकांच्या मनगटात आहे. ते मिंधे गटाच्या लोकांना पेलावणारे नाही. त्यामुळेच राणे पिता पुत्रानी शिवधनुष्य हातात घेताच त्यांना ते पेलवले नाही. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याची टीका देखील श्री. खोबरेकर यांनी केली आहे.

भाजपाच्या निलेश राणे यांनी विधानसभेच्या तिकिटासाठी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आयोजित केलेल्या सभेला गर्दी जमवण्यासाठी बचत गटांच्या महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. एकनाथ शिंदेंच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी काही अधिकाऱ्यांच्या मार्फत बचत गटांच्या महिलांना जबरदस्ती करण्यात आली होती. मेळाव्याला न आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कुडाळच्या सभेला बचत गटांच्या महिलांचीच गर्दी दिसून आली. त्यामुळे हा मेळावा म्हणजे बचत गटाचे स्नेहसंमेलन होते का ? असा प्रश्न पडला आहे. या स्नेहसंमेलनात एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या हातात शिवधनुष्य दिला. त्यावेळी त्यांना तो पेलवता आला नाही. रामायणावेळी राक्षसांना देखील शिवधनुष्य उचलता आले नव्हते. ते उचलण्याची ताकद फक्त श्रीरामात होती. वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीच्या दहा वर्षात कुडाळ मालवण मतदार संघातील दहशत मोडून काढून येथे रामराज्य आणले. त्यामुळे शिवधनुष्य त्यांच्याच हाती शोधून दिसते. या उलट नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा येथून विजय झाल्यानंतर पुन्हा एकदा जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. ठेकेदारी मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात बाऊन्सर आणले जाऊ लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवाळीत या राक्षसरूपी वृतीचा बिमोड करण्याचा निर्धार कुडाळ मालवणच्या जनतेने केला आहे. आपला विजय हा निश्चित असून शिवसैनिकांनी देखील गाफिल न राहता येत्या 20 ते 25 दिवसात जागृत राहून प्रचाराचे काम करावे, आणी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात फोफाऊ पाहात असलेल्या या राक्षसी वृत्तीला कुडाळ मालवणच्या वेशीबाहेर ठेवावे, असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!