जागतिक आपत्ती निवारण दिनानिमित्त एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम

मानवनिर्मित संकटांचा पर्यावरणावर होणारा परिणाम यावर मान्यवरांकडून शास्त्रोक्त मार्गदर्शन

मालवण | कुणाल मांजरेकर

जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून ओरोस सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. निसर्गाने किंवा मानवाने निर्माण केलेल्या संकटांचा समाज किंवा पर्यावरणावर होणाऱ्या प्रतिकूल परिणामांवर शास्त्रीयदृष्ट्या योग्य उपाययोजना कशी करता येईल, याचे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सौ. राजश्री सामंत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सहाय्यक डॉ. मनिरुद्धमान एस. के., सहाय्यक उपनियंत्रक आनंद शिंदे त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल, डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल, प्राचार्य विशाल कुशे आदी उपस्थित होते.

यावेळी सौ. राजश्री सामंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपत्ती व्यवस्थापन विभागात कोणत्या प्रकारची कामे असतात, याची सविस्तर माहिती देत त्याचे महत्त्व पटवून दिले. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण का महत्त्वाचे आहे हे देखील विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले. आता बऱ्याच ठिकाणी आपत्ती येत असतात. त्याला कसे सामोरे जावे आणि तेथील स्थानिक नागरिकांना त्याची माहिती मिळावी. या दृष्टीने बरेच उपक्रम चालू असतात, असे सांगून १३ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या जागतिक आपत्ती निवारण दिनाचे औचित्य साधून एमआयटीएम. कॉलेजने विद्यार्थ्यांना सुंदर अशा प्रकारे मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रम राबविला याकरिता त्यांनी कॉलेजचे आभार मानले.

डॉ. मनिरुद्धमान एस. के. यांनी विद्यार्थ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या प्रकारांची माहिती दिली व जगामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती येतात, याविषयी तपशील व वर्गवारी करून दिली. आतापर्यंत झालेल्या तसेच नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त मानवनिर्मित आपत्ती पण भीषण असते. याचा समतोल कसा राखावा याचेही मार्गदर्शन केले. तर आनंद शिंदे यांनी मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी कशाप्रकारे सेवा दिली जाते, याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले. हार्ट अटॅकच्यावेळी रुग्णाला तत्काळ सेवा देऊन त्याला योग्य डॉक्टरचा उपचार मिळेपर्यंत त्यांच्यावर प्राथमिक उपचार कसे करता येतील याची माहिती दिली व जीव कसा वाचू शकतो याचे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष पाल यांनी देखील विद्यार्थ्यांना थोडक्यात मार्गदर्शन केले तसेच वि‌द्यार्थ्यांना बहुमूल्य ज्ञान दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले. डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढणाल यांनी आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, त्याविषयी वि‌द्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून ते समजून घेणे आवश्यक आहे असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिव्हील विभाग प्रमुख प्रा. सिद्धार्थ जाधव आणि प्रा. सौ. सलीमा नदाफ यांनी विशेष प्रयत्न केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!