अवकाळी पावसाची आ. नितेश राणेंकडून दखल ; भातशेतीच्या नुकसानीचे कृषी विभागाकडून पंचनामे करण्याची मागणी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर शासनाकडे अहवाल सादर करा ; जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
कणकवली : गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याची भाजपा आमदार नितेश राणे यांनी दखल घेतली आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी लवकरात लवकर शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या मागणीचे नुकसानीचे निवेदन आ. राणे यांनी जिल्हाधिकाऱ्याना सादर केले आहे.
कोकणातील खरीप हंगामातील मुख्य पीक असलेली भातशेती सद्या कापणीच्या स्थितीत आलेली आहे. परंतु दररोज कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे भात शेतीचे कुजून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने वाहून गेल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाह कसा करावा हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या भात शेतीच्या नुकसानी बाबत कृषी विभागाकडून त्वरित पंचनामे तयार करण्यात येऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनास अहवाल सादर करावा, असे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.