कोकण रेल्वे मार्गावर रो – रो सेवा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार
नूतन क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांची को. रे. प्रवासी समन्वय समितीला ग्वाही
मालवण : कोकण रेल्वेचे नूतन क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांनी बुधवारी सिधुदुर्ग रेल्वे स्टेशनला भेट देऊन येथील समस्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोकण रेल्वे प्रवाशी समन्वय व संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी विविध प्रश्नांवर समिती पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. कोकण रेल्वेच्या माध्यमातून येथील आंब्यासह विविध कोकणी मेवा वाशी सह अन्य मार्केटला नेण्यासाठी या मार्गावर रो – रो सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली यावर सकारात्मक विचार करून त्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही श्री. बापट यांनी दिली. दरम्यान, जिल्हयातील सर्वच रेल्वे स्थानाकावरील स्वच्छतेचा प्रश्न, सांडपाणी निचरा, स्टेशनवरील बंद सिसीटीव्ही आ..दी प्रश्न देखील प्राधान्याने सोडवू. असे ते म्हणाले. जलद गाड्यांना जिल्ह्यात थांबा देणे, बोर्डवे- कसाल स्टेशनची मागणी बाबत तुम्ही वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, व्ही. डी. सामंत, जिल्हा समन्वयक नंदन वेगुर्लेकर, सचिव अजय मयेकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्नील गावडे, बाबुराव गावडे व रिक्षा संघटना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग स्टेशनवर प्रवाशी निवारा शेड उभाराव्यात, ‘कोरे’ मार्गावरून धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकावर थांबा द्यावा, कोरोना काळापासून बंद असलेली रत्नागिरी मडगाव पॅसेजर पूर्ववत सुरू करावी, स्टेशनवर डिजीटल साईन बोर्ड कोच नंबर सह असावेत, को.रे. प्रवासी सल्लागार समितीवर सिंधुदुर्गाचे प्रतिनिधी म्हणून व्यापारी महासंघाच्या सदस्याची नियुक्ती करावी, आदी मागण्याही रेल्वे प्रवासी समिती पदाधिकाऱ्यांनी बापट यांच्याकडे मांडल्या. क्षेत्रीय प्रबंधक शैलेश बापट यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले..