…. तर मोठ्या जहाजांना मालवणात मिळणार थांबा : वैभव नाईक

मालवण बंदर जेटीवरील नव्या प्रशस्त जेटीचे नोव्हेंबर अखेरीस उद्घाटन

मत्स्य तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख उपस्थिती ; किल्ल्यावर नवीन जेटी प्रस्तावित

कुणाल मांजरेकर

मालवण : आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने मालवण बंदर जेटी नजीक उभारण्यात आलेल्या नव्या प्रशस्त जेटीचे काम पूर्णत्वास आले आहे. मुख्यमंत्र्यांकडे बंदर जेटी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची मागणी केली असून त्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. जिल्हा नियोजनमधून या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याची ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत या जेटीचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

मालवण दौर्‍यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी येथील बंदर जेटी परिसरात नव्याने बांधलेल्या प्रशस्त जेटीची पाहणी केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, पंकज सादये, किसन मांजरेकर, अन्वय प्रभू, सन्मेश परब, मंगेश सावंत, मेरीटाईम बोर्डाचे अभियंता श्री. पेटकर, श्री. गायकवाड, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, साहेबराव कदम यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार नाईक म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली येथील पूर्वीची जेटी ही जुनाट बनल्याने याठिकाणी नवीन जेटी बांधण्यात यावी अशी मागणी किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटना, नगराध्यक्षांसह शिवप्रेमींनी केली होती. त्यानुसार चार वर्षापूर्वी याठिकाणी नवीन सुसज्ज जेटीच्या बांधकामास मंजुरी मिळाली. सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून सुसज्ज अशी जेटीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याठिकाणी सनशेड आणि कंपाउंडचे काम शिल्लक असून या कामासाठी अडीच ते तीन कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. त्यामुळे हे कामही लवकरच मार्गी लावले जाईल. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनमधून वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणून ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला जाणार आहे.

… तर मुंबई – गोवा मार्गावरील मोठ्या जहाजांना मालवणात मिळणार थांबा

मालवणात वाढत्या नौकांमुळे त्या उभ्या करून ठेवण्यात अनेक अडचणी भासत आहेत. त्यामुळे नव्या नौकांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी मेरीटाईम बोर्डाकडे करण्यात आली आहे. मोठ्या नौकांसाठी टर्मिनल उभारणीचा ५० टक्के राज्य शासन व ५० टक्के केंद्र शासन असा १०० कोटीचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास मुंबई ते गोवा मार्गावर ये जा करणाऱ्या मोठ्या प्रवासी जहाजांना या टर्मिनलला फायदा होईल. यादृष्टीने आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!