केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा आज सिंधुदुर्गातील व्यावसायिकांशी संवाद
व्यावसायिकांच्या अडीअडीचणी जाणून घेणार : कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांची माहिती
मालवण : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजता कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे सिंधुदुर्गातील व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्या अडीअडचणी ते जाणून घेणार आहेत. या संधीचा फायदा घेत जिल्ह्यात नवे उद्योगपर्व घडवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन कमळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पराडकर यांनी केले आहे.
देशातील ८० टक्के उद्योग योजना समाविष्ट असणाऱ्या या खात्या अंतर्गत आपल्या होमटाऊन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवे आणि महत्वाकांक्षी उद्योगपर्व निर्माण व्हावे ही ना. राणे यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने उद्योजक व व्यवसायिकांसोबत चहापानाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे. जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक आणि उद्योजकांनी यावेळी उपस्थित राहून आपल्यासमोरील अडचणी आणि मागण्या थेट मंत्रीमहोदयांसमोर मांडून त्याचा पाठपुरावा करावा असे आवाहन अविनाश पराडकर यांनी केले आहे.
कुडाळ एमआयडीसी रेस्टहाऊस येथे सायंकाळी ४. ४५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. एमएसएमई रोड मॅप कोअर कमिटी जिल्ह्यात नव्या-जुन्या उद्योजकांना योजनांचा योग्य फायदा व्हावा यासाठी मागील काही दिवस सातत्यपूर्ण प्रयत्न करत असून आजही उद्योजकांसोबतची संवादचर्चा अधिक फायदेशीर व्हावी यादृष्टीने या कार्यक्रमाला महत्व प्राप्त झाले आहे.