राजकोट किल्ला शिवप्रेमी जनतेसाठी खुला करावा : विष्णू मोंडकर
पर्यटन व्यावसायिक महासंघ, पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर राजकोट किल्ला पर्यटक, शिवप्रेमी जनतेसाठी बंद करण्यात आला आहे. या विषयी पर्यटक व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन राजकोट किल्ला पर्यटक व शिवप्रेमीसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.
यावेळी पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सांगितले की १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला राजकोट किल्ला पूर्णपणे नष्ट झालेला होता. राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा ऐतिहासिक राजकोट किल्ला जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पुनर्जीवित करण्यात आला. सर्व शिवप्रेमीसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. राजकोट किल्ला उभारणी झाल्यावर पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सर्व शिवप्रेमी,जिल्हा प्रशासन,स्थानिक ग्रामपंचायत यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील 30 गडकिल्ल्यावरील माती तसेच शिवनेरी व रायगड गडावरील माती कलश यात्रेच्या माध्यमातून भूमी कलश विधिवत पद्धतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राजकोट किल्ल्यावर स्थापित केला आहे.
सदर किल्यावर नेव्हीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता जो कोसळून पडला आहे. निच्छितच ही गोष्ट आम्हा शिवप्रेमींसाठी दुःखद आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघाची विनंती की छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले गड किल्ले शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी असून राजकोट किल्लाही जलकोट साक्ष देणारा इतिहास असून त्या जागी नवीन शिवपुतळा उभारणी साठी काही महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत राजकोट ऐतिहासिक किल्ला शिवप्रेमींच्या दर्शनासाठी बंद न ठेवता ज्या ठिकाणी सर्व गडकिल्याची माती स्थापित केलेल्या भूमी कलश स्थापित केला आहे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात शिवप्रतिमा (फोटो )स्थापित करून राजकोट किल्ला शिवप्रेमी साठी खुला करण्यात यावा ही विनंती असून यावर जिल्हाधिकारी यांनी या विषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी सांगितले अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली. यावेळी किशोर दाभोलकर सोशल मीडिया अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ, टी टी डी एस अध्यक्ष सहदेव साळगावकर, टीटीडीएस कार्याध्यश रविंद्र खानविलकर, पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, मिलिंद झाड, रामा चोपेड़ेकर, मिलिंद झाड़, मनोज खोबरेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.