चला एकजूट दाखवूया ; “मालवण बंद” यशस्वी करून विराट मोर्चात सहभागी होऊया

युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने बुधवारी २८ ऑगस्ट रोजी मालवण बंदची हाक देऊन शिवप्रेमींचा विराट मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट युवासेनेचे समन्वयक मंदार ओरसकर यांनी मालवण बंद यशस्वी करून या विराट मोर्चात शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष असलेला किल्ले सिंधुदुर्ग स्थापत्य शास्त्राचा आदर्श आहे. मालवणच्या जडणघडणीत किल्ले सिंधुदुर्गचे स्थान शिखरावर आहे. मालवणाचे पर्यटन गेल्या काही वर्षात फार मोठया प्रमाणात वाढत असून पर्यटनाचा केंद्रबिंदू किल्ले सिंधुदुर्ग आहे. या सोबत गतवर्षी किल्ले राजकोट येथे उभारणी झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवणच्या ऐतिहासिक पर्यटनात अभिमानास्पद भर ठरावी असा ठरला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी दैवत आहेत. असे असताना महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना तमाम शिवप्रेमींसाठी दुःखदायक वेदनादाई आहे. मालवणवासियांना हा धक्का आहे. मालवणच्या पर्यटनाचे नाव ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक स्तरावर पोहचले त्या महाराजांचा पुतळा मालवण भूमीतच कोसळतो ही घटना दुर्दैवी ठरली. दोषींवर कारवाई होईल, मात्र या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया. प्रामुख्याने मालवण व्यापार क्षेत्रातील व्यापारी, हॉटेल व्यवसायिक, रिक्षा व्यावसायिक व पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक यांनी निषेध नोंदविण्यासाठी आपले व्यवसाय बंद ठेवून मोर्चात सहभागी होऊया. तसेच मालवण वासियांनी या मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखवूया असे आवाहन मंदार ओरसकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!