शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाचा इफेक्ट ; आनंदव्हाळ रस्त्यावरील खडी दूर करण्याचे काम तात्काळ सुरु
ठाकरे गटाने धोकादायक रस्ता सुस्थितीत करण्याची केली होती मागणी ; जन आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सा. बां. कडून उपययोजना हाती
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण कसाल महामार्गावर आनंदव्हाळ येथील रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असून या धोकादायक बनलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास १५ ऑगस्टला जन आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने काल दिला होता. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपासून या धोकादायक रस्त्यावरील खडी साफ करण्याचे काम हाती घेतले आहे. याबाबत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी समाधान व्यक्त केले असून या रस्ता तातडीने सुस्थितीत करून मिळावा, अशी मागणी केली आहे.
प्रधानमंत्री मोदी यांच्या डिसेंबर मधील दौऱ्याच्यावेळी कसाल मालवण रस्त्यावरील आनंदव्हाळ ते गोवेकर स्टॉप या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्या पावसात हा रस्ता नादुरुस्त होऊन खडी रस्त्यावर आलेली आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्ज्याचे झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला धडक देऊन हा रस्ता गणेशचतुर्थी पूर्वी सुस्थितीत करून रस्त्यावर आलेली खडी झाडून बाजूला करण्यात यावी अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या रस्त्यावर जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळ पासून आनंदव्हाळ येथील रस्त्यावरील खडी दूर करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने शिवसेनेच्या आंदोलनाला यश आले आहे.