कुडाळकर हायस्कुल नजिकचा कचऱ्याचा प्रश्न तात्काळ मार्गी !
भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, ललित चव्हाण यांची तत्परता ; सांडपाण्याचा विषय देखील मार्गी लावण्याची ग्वाही
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण बसस्थानका समोरील जुन्या कुडाळकर हायस्कुल नजिकच्या कचऱ्याचा प्रश्न भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे तात्काळ मार्गी लागला आहे. तर येथे साचणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न देखील लवकरच सोडवण्याची ग्वाही दीपक पाटकर यांनी दिली आहे.
कुडाळकर हायस्कुल नजिकचा कचरा उचलला जात नसल्याची तक्रार स्थानिकांनी मांडली होती. त्याचप्रमाणे येथे सांडपाणी साचून स्थानिकांना त्रास सहन करावा लागत होता. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी लगेच पालिकेचे मंदार केळूसकर आणि मुकादम वळंजू यांना येथे पाचरण करून येथील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर तातडीने पालिकेची कचरा गाडी बोलावून येथील कचरा साफ करण्यात आला. यानंतर नियमितपणे येथील कचरा उचलण्याची सूचना दीपक पाटकर यांनी केली. याठिकाणी साचणारे सांडपाणी कोठून येतेय त्याची माहिती घेऊन त्यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल, असे दीपक पाटकर म्हणाले. यावेळी राजसी राजाराम मांजरेकर, अक्षता अशोक बांदिवडेकर, पुनम सुशांत पडवळ, संध्या दशरथ सळमळकर, सुरेखा कृष्णा सावंत, आरती सावंत, सलोनी राजाराम मांजरेकर, दिपाली दिपक पडवळ आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.