फेडरेशन अध्यक्ष नक्की कोणाच्या बाजूने पारंपरिक की एलईडी पर्ससीन….?
फेडरेशन अध्यक्ष यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी ; श्री रामेश्वर सोसायटी अध्यक्ष व संचालक मंडळाचे आवाहन
मालवण : एल. ई. डी मासेमारीला केंद्र आणि राज्य शासनाने बंदी घातलेली आहे. तसेच राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत पर्ससीन आणि एलईडी मासेमारीविरोधात कडक कारवाईसाठी २०२१ साली राज्य महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमांमध्ये काही महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. केंद्र शासन व राज्य शासनाच्या या कायदेशीर तरतुदी असताना ही बाब फेडरेशनच्या सभेत फेडरेशन अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी का मांडली नाही. याउलट समर्थन का केले. एवढी वर्ष एक अभ्यासू फेडरेशन अध्यक्ष असून त्यांना ही बाब लक्षात आली नाही का? फेडरेशन अध्यक्ष यांनी सर्वप्रथम आपली एलईडी पर्ससीन आणि अनधिकृत पर्ससीन मासेमारीबाबत भूमिका स्पष्ट करावी. त्यांची भुमिका पारंपरिक मच्छीमारांच्या हिताची असेल तरच आम्ही आमचे शब्द मागे घेऊ अथवा आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत, असे श्री रामेश्वर मच्छीमार सहसंस्थेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने म्हटले आहे.
२९ जुलै रोजीच्या सभेबाबत जिल्हा मच्छीमार सहकारी फेडरेशनकडून श्री रामेश्वर मच्छिमार सह. संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना असे सूचित केले की राज्याचे मत्स्य विकास धोरण या संदर्भात बैठक व अभिप्राय याविषयास अनुसरून सभेसाठी / पत्रकार परिषदेसाठी सर्व मच्छिमार संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्या सभेमध्ये/पत्रकार परिषदेमध्ये एल. ई. डी पर्ससीन हा विषय मांडला गेला. त्यावेळी धुरी यांनी एलईडी आणि पर्ससीनच्या समर्थनार्थ भुमिका मांडणा-यांना का रोखले नाही हा आमचा सवाल आहे, असे रामेश्वर मच्छीमार संस्थेकडून सांगण्यात आले.