कुडाळ – मालवणात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढावी ; पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा आग्रह

संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांची माहिती ; येत्या रविवारपर्यंत मतदार संघाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करणार

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ- मालवण विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा मतदार संघ असल्याने या मतदार संघात शिवसेनेच्याच उमेदवाराने धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्या अनुषंगाने आज आढावा घेण्यात आला आहे. येत्या रविवारपर्यत मतदार संघाचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे अशी माहिती शिंदे शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख, आमदार रवींद्र फाटक यांनी गुरुवारी मालवण येथे पत्रकार परिषदेत दिली.

येत्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक येथील दैवज्ञ भवन येथे पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कुडाळ-मालवण विधानसभा निरीक्षक बाळा चिंदरकर, राजेंद्र फाटक, दीपक वेतकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, शहरप्रमुख बाळू नाटेकर, युवासेना जिल्हा अधिकारी ऋत्विक सामंत, युवतीसेना महिला जिल्हा अधिकारी सोनाली पाटकर, किसन मांजरेकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, चाफेखोल सरपंच रविना घाडीगावकर, महिला संघटक नीलम शिंदे, महिला तालुका संघटक आशा वळप्पी, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आमदार फाटक म्हणाले, कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक ही शिवसेनेला लढवायची आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मतदार संघाचा सर्व्हे करण्यासाठी आपण आलेलो आहोत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. सध्या जागा वाटपाचा विषय वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याने या मतदार संघाची जागा शिवसेनेला मिळावी अशी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यानुसार येत्या रविवार पर्यंत आढावा, माहिती घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. महायुतीच्या माध्यमातून ही जागा आम्हाला जिंकायची आहे यासाठीची तयारी केली जाणार आहे. 

कुडाळ- मालवण मतदार संघाची जागा ही शिवसेनेची आहे. शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी असे आमचे म्हणणे आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यानुसार याबाबतचा अहवाल त्यांना सादर केला जाईल. शिवसेना संघटना अधिक बळकट करण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. याची कार्यवाही येत्या १० ऑगस्ट पर्यंत केली जाणार आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत आपला पक्ष पुढे असावा. मुख्यमंत्री राज्यात चांगले काम करत आहेत. अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत त्यामुळे या योजनांच्या माध्यमातून आपले कार्यकर्ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावेत हेच पक्षाचे धोरण आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पर्यटन विकासासाठी नेहमीच आग्रही राहत आहेत. किनारपट्टीवरील देवगड, मालवण, वेंगुर्ले तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी जे जे अपेक्षित आहे त्याची कार्यवाही येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केली जाईल असेही आमदार श्री. फाटक यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!