पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पोलीस भरतीसाठी १६.४७ लाखाची फसवणूक

आरोपी विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; कोणत्याही भुलथापांना व आमिषाला बळी पडू नका : पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांचे आवाहन

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे येथे पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पोलीस दलामध्ये शिपाई पदावर भरती करुन देतो असे आमिष दाखवुन फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विरोधात कलम १७०, ४०६, ४१९, ४२० भादंवि अन्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील तक्कादार हे अबकारी विभागात (राज्य उत्पादन शुल्क विभाग, पेडणे गोवा) कार्यरत होते व सध्या ते सेवानिवृत आहेत. माहे डिसेंबर २०२२ मध्ये पत्रादेवी चेकपोस्टवर कर्तव्यावर असतांना त्या दरम्यान यातील आरोपी हा गोवा येथे जात असतांना सदर चेकपोस्टवर तक्रारदार यांनी त्याचे वाहन थांबवून चौकशी केली असता त्यावेळी आरोपीने स्वतःची ओळख डॉ. संदीप गुरव, कोल्हापूर, पी. एस. आय. अशी करुन देऊन तक्रारदार यांची कौटुंबिक माहिती घेतली व तक्रारदार यांच्या मुलास पोलीस शिपाई पदावर नोकरीस लावतो असे आमिष दाखवून तक्रारदार यांचेकडून वेळोवेळी टप्याटप्याने व वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १६,४७,०००/- रोख व चेक स्वरुपात घेतले. त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपीला नोकरी कधी भेटणार याबाबत विचारणा केली असता, आरोपी तक्रारदार यांना वेगवेगळे कारण देऊन टाळाटाळ करीत होता. तक्रारदार माहे जुलै २०२४ मध्ये कुटुंबासह टिव्ही वरील बातम्या पाहत असतांना नौकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाणे, खडकी (जि. पुणे) येथे दाखल गुन्हयामध्ये आरोपीताचा फोटो व नांव संदीप गुरव यास अटक करण्यात आल्याबाबत माहिती मिळाली. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजून आल्याने याबाबत त्यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात सध्या सुरु असलेल्या पोलीस भरतीमध्ये कोणीही पोलीस दलातील अगर बाहेरील व्यक्तीने भरतीमध्ये उमेदवाराला मदत किंवा निवड करतो असे आश्वासन देऊन पैशाची लाचेची मागणी केली तर उमेदवाराने त्यास बळी न पडता त्याबाबत पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे दुरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष तक्रार करणेबाबत त्याचप्रमाणे वर्तमानपत्रामध्ये व सिंधुदुर्ग जिल्ला पोलीस दलाचे संकेतस्थळावर वेळोवेळी आवाहन करण्यात आलेले आहे. तरी उमेदवार अगर त्यांचे नातेवाईक यांनी कोणत्याही एजंट, दलाल, अधिकारी, कर्मचारी यांच्या भूलथापांना, आमिषाला बळी पडू नये असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने करण्यात येत आहे. असे गैरप्रकार आढळुन आल्यास तात्काळ पोलीस अधीक्षक, कार्यालय अथवा नजीकच्या पोलीस ठाण्यास आपली तक्रार  नोंदवावी, असे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!