सर्वांगीण विकास व रोजगाराभिमुख अर्थसंकल्प !


खा. नारायण राणेंनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत
सिंधुदुर्ग (कुणाल मांजरेकर) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे माजी केंद्रीय मंत्री तथा खा. नारायण राणे यांनी स्वागत केले आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

याबाबत आपल्या एक्स अकाउंट वरून दिलेल्या प्रतिक्रियेत खा. नारायण राणे यांनी म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सलग सातव्या वर्षी देशाचा 2024-25 सालचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. या अथर्संकल्पातील तरतुदींमुळे मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असून देशातील युवा वर्गाला मोठा दिलासा मिळेल. एम.एस.एम.इ. क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींचाही हातभार रोजगार निर्मितीला लाभेल. मुद्रा योजनेतील सुधारणेमधून उद्योजकतेला फायदा होईल. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे गुंतवणूक व विशेषत: थेट परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल. कृषि क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींमुळे बळीराजाला लाभ होण्याबरोबरच शेतीमध्ये मूलभूत सुधारणा वेगाने होतील. आयकरातील सुधारणांमुळे मध्यम वर्गाला दिलासा मिळेल. सर्वांगीण विकास व रोजगाराभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

