विनायक राऊत, वैभव नाईकांवर टीका करण्यापूर्वी मच्छिमारांच्या आंदोलनात खांद्याला खांदा लावून लढा…
भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या टिकेला शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख बाबी जोगींचे प्रत्युत्तर
प्रत्येक अधिवेशनात पारंपरिक मच्छिमारांचा आवाज बनून सरकारला जाग आणण्यात आ. वैभव नाईक अग्रस्थानी
मालवण | कुणाल मांजरेकर
माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांचा शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी समाचार घेतला आहे. विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात पारंपरिक मच्छिमारांचा आवाज बनून सरकारला जाग आणण्याचे काम वैभव नाईक यांनी केले आहे. याची माहिती नसेल तर विधिमंडळ कामकाजाचे व्हिडीओ तुम्हाला दाखवण्याची माझी तयारी आहे. मच्छिमारांचे प्रश्न सोडवण्यासासाठी नुसती पत्रकबाजी करून काहीही होणार नाही, विनायक राऊत, वैभवं नाईक यांच्यावर टीका करण्यापूर्वी पारंपरिक मच्छिमारांच्या लढयात त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा, असा सल्ला श्री. जोगी यांनी बाबा मोंडकर यांना दिला आहे.
बाबा मोंडकर यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. वैभव नाईक, माजी खा. विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती. त्याला बाबी जोगी यांनी उत्तर दिले आहे. प्रसिद्धिपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आमदार वैभव नाईक हे पारंपारिक मच्छीमारांवर आलेल्या लढ्यातील संकटाला मच्छीमारांबरोबर कायम उभे दिसले. तुम्ही टीका करताय तुम्ही किती वेळा दिसलाय हे जरा आत्मपरीक्षण करा. आमदार वैभव नाईक प्रत्येक अधिवेशनात मच्छीमारांचा आवाज बनून सरकारला जाब विचारतात. ते तुम्ही ते बघितलं नसेल तर मी तुम्हाला सभागृहातील व्हिडिओ दाखवण्याची व्यवस्था करतो. आज होणाऱ्या मत्स्यधोरणाच्या बैठकीसाठी आमदार वैभव नाईक यांनी तज्ञ मच्छीमार मच्छीमार संघटना यांच्याकडून सूचना घेऊन त्या आपल्या पत्रात सर्व नमूद करून दिलेल्या आहेत. याची नोंद तुम्हाला मालवणच्या फिशरीज ऑफिसमध्ये मिळू शकते आणि या मीटिंगमध्ये पारंपारिक मच्छीमार यांचं म्हणणं, उपाययोजना काय कराव्यात हे आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत जाणार एवढं नक्की. तुम्ही फक्त पत्रकार परिषद घ्या, आमदारांवरती टीका करा. पण मच्छीमारांनाही माहित आहे, आपल्यावरती केसेस पडल्या त्यावेळी आपल्याबरोबर कोण कोण उभे होते आणि कोण कुणाच्या बाजूने होते. ज्यावेळी वादळामध्ये मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले, त्यावेळी आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना याची माहिती देऊन मालवण धुरीवाडा चिवला बीच येथील मच्छीमारांच्या नुकसानीची पाहणी केली आणि मच्छीमारांनी जेवढे नुकसान सांगितले, तेवढी नुकसान भरपाई त्यावेळी मच्छीमारांना फक्त आमदार वैभव नाईक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मिळालेली आहे. आज पर्यंत एवढं अनुदान देण्याची कुठच्याही सरकारची दानत झाली नाही. नुसती पत्रकबाजी करून काही होणार नाही. मच्छीमार तुमची ही नौटंकी जाणून आहेत. आणि मच्छीमारांचे प्रश्न, समस्या ह्या शासनापर्यंत आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत पोहोचल्या आहेत, असे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.