गटविकास अधिकारी – उपसभापतींमध्ये “तू तू मै मै” ; ठराव घेण्यावरून बाचाबाची

सदस्यांना अनामत रक्कम जप्त करण्याचा ठराव घेण्याचा अधिकार नाही : बीडीओ

आमचे अधिकार ठरवणारे तुम्ही कोण ? उपसभापतीही आक्रमक

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेत निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवण्याऱ्या ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या विषयावरून उपसभापती राजू परुळेकर आणि गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. अनामत जप्त करण्याचा ठराव घेण्याचा अधिकार सदस्यांना नाही, असे सांगत गटविकास अधिकाऱ्यांनी असा ठराव घेण्यास नकार दर्शवला. त्यावरून आक्रमक झालेल्या राजू परुळेकर यांनी आमचे अधिकार ठरवणारे तुम्ही कोण ? असा सवाल उपस्थित केला. अखेर सभापती अजिंक्य पाताडे आणि ज्येष्ठ सदस्य अशोक बागवे यांनी यामध्ये मध्यस्थी करीत हा वाद मिटवला. यावेळी ठेकेदाराच्या सुरक्षा अनामत रक्कमेतून ही दुरुस्ती करावी, अन्यथा त्याच्यावर कारवाई करावी, असा ठराव घेतला गेला.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्यासह कमलाकर गावडे, विनोद आळवे, अशोक बागवे, गायत्री ठाकूर, मनीषा वराडकर, सोनाली कोदे, मधुरा चोपडेकर, निधी मुणगेकर आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी अशोक बागवे आणि निधी मुणगेकर यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या चिंदर त्रिंबक आणि हिर्लेवाडी भंडारवाडा ह्या रस्त्याची दुरवस्था झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी ठेकेदाराच्या अनामत रकमेतून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, याबाबतचा ठराव घ्या, असे उपसभापती राजू परुळेकर यांनी सांगितले. यावर गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी असा ठराव घेता येणार नाही, असं वक्तव्य केल्याने उपसभापती आक्रमक झाले. ठराव घेता येणार नाही, असे सांगणारे तुम्ही कोण ? असा सवाल त्यांनी केला. तर गटविकास अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अनामत रक्कम जप्त करण्या ऐवजी त्या ठेकेदाराची सुरक्षा अनामत रक्कम संबंधित विभागाकडे आहे, त्यातून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, असे गटविकास अधिकारी म्हणाले. यानंतर सभापती अजिंक्य पाताडे आणि माजी उपसभापती अशोक बागवे यांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटवला. यावेळी ठेकेदाराने सुरक्षा अनामत रक्कमेतून सदरील रस्ता दुरुस्त करवाझ अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा ठराव घेण्यात आला. संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाच्या चुकीमुळे नाहक आमच्यात वाद होत असल्याचे अशोक बागवे म्हणाले.

यावेळी मधुरा चोपडेकर यांनी वायरी, तारकर्ली आणि देवबाग या तीन गावात रात्रपाळीला वायरमन नसल्याचे सांगून हे गाव पर्यटन गाव असल्याने येथे रात्रपाळीस वायरमन आवश्यक असल्याचे सांगितले. यावर सध्या वायरमन पदे रिक्त असल्याचे उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!