मालवणच्या तहसीलदार महसूली कामकाजात पडतायत कमी ?
राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार ; भर पावसात आंदोलनाचा दिला इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणच्या विद्यमान तहसीलदार श्रीमती वर्षा झालटे यांच्या कारभाराबद्दल राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी नाराजी व्यक्त करणारे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. विद्यार्थ्यां सह नागरिकांना तहसील कार्यालयातून मिळणाऱ्या दाखल्या मध्ये होत असलेल्या दिरंगाई वरून श्री. मोंडकर यांनी ही नाराजी व्यक्त केली असून कार्यालयावर त्यांची पकड नसल्याचे म्हटले आहे. तहसीलदार कार्यालयात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा- दाखल्यांबाबत दिरंगाई होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाव लागत आहे. उत्पन्न दाखला, डोमेसाईल, जातीचे दाखले, विविध पेंशन योजना, जेष्ठ नागरिक कार्ड व अन्य विविध दाखले यांबाबत नागरिकांना तब्बल तीन ते चार महिने वाट पहावी लागत आहे. विद्यमान तहसीलदार महसूली कामाबाबत अनुभवाने कमी असल्याने या समस्या उद्भवत असून जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे स्वतः जातीनीशी लक्ष घालून ही समस्या दूर करावी. अन्यथा भर पावसात आंदोलन छेडण्याचा इशारा अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून दिला आहे.
या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की, अनेकदा शहरातील व गावागावांमधून नागरिक मालवण तहसीलदार कार्यालयात या सुविधांसाठी येत असतात. हे नागरिक वारंवार फेऱ्या मारत आहेत. पण सेतूमधून संबंधित टेबलावर जाण्यासाठी तसेच साधं टपाल नोंद दाखल झाल्यानंतरही हे दाखले संबंधित अधिकारी यांची सही होण्यासाठी त्या टेबलावर जाण्यापूर्वी टपाल टेबलावर पंधरा ते वीस दिवस ताटकळत पडले असतात. यामुळे नागरिकांना भर पावसात देखील विनाकारण वेळेच्या अपवय व आर्थिक भुर्दंडला सामोरे जावे लागत आहे. अनेक शाळा – कॉलेज विद्यार्थी, पालक, महिलांनी या समस्येकडे लक्ष वेधले आहे. सदरच्या प्रशासकीय बाबींची पूर्तता करण्यास विद्यमान तहसीलदार या महसुली कामा बाबत अनुभवाने कमी असल्याचे जाणवत आहे. यापूर्वी या तहसीलदार कार्यलयात आलेल्या तहसीलदार व आजच्या विद्यमान तहसीलदार यांमध्ये कामाची तत्परता तसेच कार्यालयीन पकड नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्हाधिकारी यांनी याबाबत स्वतः लक्ष घालून तत्काळ नागरिकांना सुविधां – दाखले वितरित करण्यात यावेत, अशी मागणी अरविंद मोंडकर यांनी केली आहे.