जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा
नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा ; जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे आदेश
सिंधुदुर्गनगरी (जिमाका) अतिवृष्टी व पुरामुळे शेतींचे नुकसान झाले आहे. कृषी, महसूल आणि सबंधित विभागांनी या नुकसानीचे तात्काळ संयुक्त पंचनामे करावेत. या पंचनाम्यातून एकही बाधित शेतकरी राहू नये , असे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिले आहेत.
अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर आढावा आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अपर जिल्हाधिकारी रवि पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रविंद्र मठपती, सर्व प्रांत अधिकारी, सर्व तहसिलदार, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शेती नुकसानीच्या पंचनाम्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन तसा नुकसानीचा अहवाल सादर करावा, अशा सूचना श्री तावडे यांनी या बैठकीत केल्या. ज्या गावातील वीजपुरवठा खंडित झालेला आहे तो तात्काळ सुरळीत करावा, शाळांना हानी पोहचली असल्यास दुरुस्ती करावी, पर्यटन स्थळे तसेच धबधबे किंवा इतर ठिकाणी गर्दी होणार नाही याची संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी. अतिवृष्टीमुळे स्थलांतर झालेल्या ठिकाणी साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी, आरोग्य शिबीर घ्यावेत, नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणांनी देखील दक्षता घ्यावी, वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासावे आणि गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करावा, धरणातून पाणी सोडताना नागरिकांना पूर्व सूचना द्यावी, खारेपाटण ते बांदा महामार्गावर पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, या अनुषंगाने नालेसफाई करावी तसेच सर्विस रोडची ही देखभाल दुरुस्ती करावी असेही जिल्हाधिकारी म्हणाले.