मालवणच्या श्री देव रामेश्वर मंदिरात ११ जुलैपासून ‘महारुद्र स्वाहाकार’
भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : देवस्थान कमिटीचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावात सुख-शांती समृद्धी लाभावी तसेच जनकल्याणासाठी देवस्थान कमिटी आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ‘महारुद्र स्वाहाकार’ ११, १२, १३ जुलै रोजी संपन्न होणार आहे. १३ वर्षांनी हा कार्यक्रम होत असून या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी इ. ट्रस्टचे अध्यक्ष हरीश गावकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात आज देवस्थान ट्रस्टच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हरीश गावकर, अरविंद गांवकर, बाबाजी गांवकर, उदय गांवकर, राजन गांवकर, आप्पा गांवकर, महेश गांवकर, आनंद गांवकर, शिताकांत गांवकर, दादा गांवकर, कल्पेश गांवकर, योगेश गांवकर, विजय गांवकर, राजन बादेकर, दिनेश गांवकर, राजु गांवकर, अक्षय गांवकर, संजय लुडबे आदी उपस्थित होते. यावेळी म्हणाले कोरोना काळात रामेश्वर मंदिरात महारुद्र स्वाहाकार हा कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र यावर्षी या कार्यक्रमासाठी मुहूर्ताचा योग असल्याने यावर्षी हा कार्यक्रम ११ ते १३ जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे. मालवण मधील सर्व नागरिक, व्यापार, व्यवसाय यांच्या भरभराटीसाठी व जनकल्याणसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी २५ पुरोहित उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मालवणसह इतर गावातील अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभले आहे, असे यावेळी हरीश गावकर यांनी सांगितले.
महारुद्र स्वाहाकार निमित्त गुरुवार दि. ११ जुलै रोजी सकाळी ७ वा. पासून दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व देवतांना आमंत्रण, श्री गणेशपुजन पुण्याह वाचन, श्री देव रामेश्वर महारुद्र अभिषेक व शोडषोपचार पुजा, सायंकाळी ६ वा. कुलस्वामिनी प्रासादिक भजन मंडळ, आनंदव्हाळ घाडीवाडी श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, पावशी कुडाळ बुवा : अरुण घाडी यांचे भजन, शुक्रवार दि. १२ जुलै रोजी सकाळी ८ वा. पासून दुपारी १२ वा. पर्यंत श्री देव रामेश्वर उर्वरीत महारुद्र अभिषेक व शोडषोपचार पुजा, अग्निस्थापना व देवता स्थापना, ग्रहयज्ञ, सायं. ५.३० वा. सुरसंगम (संजय वराडकर ग्रुप) गायनाचा कार्यक्रम, रात्रौ ९ वा. सुप्रसिद्ध राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. हरिहर नातू यांचे किर्तन, शनिवार दि. १३ जुलै रोजी सकाळी ८ वा. पासून श्री देव रामेश्वर शोडषोपचार पुजा, स्थापित देवता पुजन आणि रुद्रस्वाहाकार बलिदान, पुर्णाहुती, उपस्थित जनांना मंत्राभिषेक, आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ५. ३० वा. श्री. उमेश वि. मेस्त्री आणि सहकारी गायनाचा कार्यक्रम, रात्री ८ वा. घुमडाई प्रासादिक भजन मंडळ, घुमडे मालवण बुवा : नाना सामंत यांचे भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, तसेच इच्छुकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी हरीश गावकर यांनी केले.