किनारपट्टीवरील व्यवसायिकांच्या प्रश्नांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरु
मागील दहा वर्षांचा बॅकलॉग येत्या पाच वर्षात भरून काढणार ; भाजपा नेते निलेश राणेंची ग्वाही
मालवण : किनारपट्टीवर अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. येथील पर्यटन व्यावसायिकांसमोर अनेक समस्या आहेत. या कामांचा मंत्रालयस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला असून मागील दहा वर्षांचा बॅकलॉग येत्या पाच वर्षांत आपण भरून काढणार असल्याचे भाजपा नेते निलेश राणे म्हणाले.
वायरी येथील हॉटेल किनारा येथे पर्यटन व्यावसायिकांची बैठक संपन्न झाली. यावेळी श्री. राणे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर, अशोक तोडणकर, तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, देवानंद लोकेगावकर, शक्ती केंद्र प्रमुख केदार झाड, मनोज खोबरेकर, दाजी सावजी, महेश लोके गावकर, बाळू पडवळ, पंकज सादये, मंदार लुडबे, बबन गावकर, पांडू मायनाक यांसह अन्य उपस्थित होते.
वायरी गावच्या समस्या सोडविणार : निलेश राणे
वायरी भूतनाथ गावामध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्यामुळे येथील पर्यटन व्यावसायिक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा करूनही समस्या जैसे थे राहिली आहे. गावामध्ये योग्य क्षमतेचे विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावेत अशी मागणी देवानंद लोकेगावकर यांनी केली. त्याचप्रमाणे गावातील अंतर्गत रस्ते, आणि पर्यटन सुविधांचा विकास व्हावा अशी ही त्यांनी मागणी केली. यावर निलेश राणे यांनी आपल्या मागण्या लवकरच मार्गी लावल्या जातील, अशी ग्वाही दिली.
राणे म्हणाले, किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायिकांना अकृषिक शेत सारा तसेच विजेच्या प्रश्नाचा सामना करावा लागत आहे. तुम्ही संधी दिली तर इथले सर्व प्रश्न मी स्वतः सभागृहात मांडणार आहे. आपल्या प्रश्नांचा पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र लोकांना खुश करण्यासाठी मी काम करत नाही तर हा माझ्या कामाचा एक भागच समजतो. किनारपट्टी भागातील लोक आमच्या नेहमीच ह्रुदयात आहेत. लोकसभेची लढाई सोपी नव्हती. परंतु इथल्या जनतेने चमत्कार घडवून आणत लोकसभेला विजय खेचून आणला आहे. जे काही प्रश्न या भागात शिल्लक राहिले आहेत त्यांची पूर्तता करण्याचे काम लवकरच होईल. आपणही केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजेत असेही राणे शेवटी म्हणाले.
तोडणकर यांना मदतीचा हात
वायरी भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम तोडणकर यांचे राहते घर काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जळाले. यात तोडणकर यांचा संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाला. बुधवारी सकाळी निलेश राणे यांनी जळालेल्या घराची पाहणी करत. विक्रम तोडणकर यांची भेट घेतली. यावेळी राणे यांनी तोडणकर यांना धीर देत मदतीचा हात दिला.