मालवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी रमाकांत वाक्कर यांची निवड 

सचिवपदी पंकज पेडणेकर तर खजिनदारपदी रंजन तांबे यांची नियुक्ती ; १२ जुलैला पदग्रहण सोहळा

मालवण : रोटरी क्लब ऑफ मालवणची सन २०२४ – २५ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी रमाकांत वाक्कर यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी पंकज पेडणेकर व खजिनदारपदी रंजन तांबे यांची निवड करण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती रोटरी क्लबच्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

मालवण येथील हॉटेल स्वामी येथे रोटरी क्लबची पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी मावळते अध्यक्ष अभय कदम, नवनिर्वाचित अध्यक्ष रमाकांत वाक्कर, महादेव पाटकर, पंकज पेडणेकर, रंजन तांबे, श्री. वनकुद्रे, ऋषी पेणकर आदी उपस्थित होते. यावेळी अभय कदम यांनी वर्षभरात आपल्या अध्यक्षपदाच्या काळात रोटरीतर्फे राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. रोटरी क्लब तर्फे मालवणात रक्तदान शिबीरे, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, शिलाई मशीन वाटप, शालेय साहित्य वाटप, उत्तम समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, पाककला स्पर्धा, माध्यमिक शाळांना टीव्ही व शैक्षणिक सॉफ्टवेअर प्रदान, आरोग्य तपासणी शिबीरे, समरगीत स्पर्धा, आदी विविध उपक्रम राबविले. यासाठी सर्व रोटरी सदस्यांचे सहकार्य लाभले असे अभय कदम यांनी सांगितले. 

यावेळी रमाकांत वाक्कर यांनी येत्या वर्षात गौरीशंकर धाकोजी यांच्या वतीने रोटरी मार्फत १ लाख वृक्षारोपण करण्यात येणार असून यामध्ये पहिल्या टप्प्यात ११ हजार झाडे लावण्यात येणार आहेत, असे सांगितले. मालवणात कचरा कुंड्यांची व्यवस्था तसेच ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारी मशीन उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लब पुढाकार घेणार आहे. तसेच मालवण, देवगड, शिरोडा, वेंगुर्ला या सागरी किनाऱ्यावरील ठिकाणी रोटरी मार्फत पर्यटकांसाठी लाईफ गार्ड, सेफ्टी साधनसामग्री तसेच पाहणी मनोरा उभारण्यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे, असेही वाक्कर यांनी सांगितले. मालवण क्लबचे महादेव पाटकर यांची रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर नियुक्ती झाल्याचे वाक्कर यांनी सांगितले. यावेळी महादेव पाटकर यांनी मालवणात प्लास्टिक बॉटल्सचा कचरा मोठ्या प्रमाणात होत असल्याने केवळ बॉटल्स टाकण्यासाठी बॉटलच्या आकाराच्या मोठ्या कचरा कुंड्या काही ठिकाणी बसविण्यासाठी रोटरीचे प्रयत्न आहेत, असे सांगितले.

यावेळी महादेव पाटकर यांनी रोटरी क्लब मालवणच्या निवडलेल्या नवीन कार्यकारिणीची माहिती दिली. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष- रमाकांत वाक्कर, उपाध्यक्ष – उमेश सांगोडकर, सचिव – पंकज पेडणेकर, सहसचिव – चंद्रशेखर पेंडूरकर, खजिनदार – रंजन तांबे, माजी अध्यक्ष – अभय कदम, क्लब सर्व्हिस- डॉ. लिना लिमये, कम्युनिटी सर्व्हिस- रतन पांगे, व्होकेशनल सर्व्हिस- सुहास ओरसकर, इंटरनॅशनल सर्व्हिस- प्रदिप जोशी, युथ सर्व्हिस- अपूर्व फर्नांडीस, रोटरी फाऊंडेशन- डॉ. अजित लिमये, मेंबरशिप डेव्हलपमेंट- विठ्ठल साळगांवकर, क्लब अॅडमिन- प्रो. प्रसन्नकुमार मयेकर, क्लब बुलेटिन- प्रो. उज्ज्वला सामंत, सार्जंट अॅट आर्मस- अमेय पारकर, स्पोर्टस चेअरमन- मनोज रावले, क्लब ट्रेनर- अभय कवटकर, लिटरसी प्रमोशन- प्रो. सुविधा तिनईकर, डायरेक्टर पोलिओ प्लस- डॉ. अच्युत सोमवंशी, क्लब फेलोशिप- श्रीकृष्ण तारी.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!