निसर्गाने भरपावसात डोक्यावरील छत्र केले जमीनदोस्त ; भाजपा पदाधिकारी आणि रोटरी क्लब मदतीला
त्या कुटुंबानी अनुभवला “माणुसकीचा ओलावा” ; निलेश राणे यांच्याकडून देखील मदत उपलब्ध
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत। सुप्रिया वालावलकर, रोटरीचे उदय जांभवडेकर आले मदतीला
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्गात सध्या पावसाचा कहर सुरु आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी आले असून अनेक ठिकाणी पडझड सुद्धा झाली आहे. यामध्ये ओरोस ख्रिश्चनवाडी मधील आठ कुटुंबांचे राहत्या घराचे छत्र निसर्गाने भरपावसात जमीनदोस्त केल्याची घटना रविवारी घडली. त्यामुळे ती आठ कुटुंबे कोलमडून गेली. घर कोसळून आपला घर संसार पुराच्या पाण्याने मातीत गाडला गेल्यामुळे फक्त अंगावरील कपड्यात ही कुटुंबे रस्त्यावर आलीत. या कुटुंबातील २१ जणांची केविलवाणी अवस्था झाली. ही दुर्दैवी व भावनिक परिस्थिती लक्षात येताच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाई सावंत, सुप्रिया वालावलकर, रोटरीचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस, उदय जांभवडेकर आदी मान्यवरानी केलेली मदत माणुसकीचा ओलावा दाखवणारी ठरली.
या वाडीतील कांशीराम भगवान भोगले, सुरेश शिवराम भोगले, फ्रान्सिस घाबरियल फर्नांडिस, फ्रान्सिस बावतीस फर्नांडिस, बेनेत अगस्तीन फर्नांडिस, शरद तातोबा परब, राधाबाई विशाल भोगले, प्रभावती शांताराम भोगले या आठ कुटुंबांची घरे जमीनदोस्त झाली. २१ जण महिला मुलांसह बाधित झाले. या भरपावसात ना घर ना कपडे ना अन्नधान्य सर्वच मातीमोल झाले. या कुटुंबांना सावरण्यासाठी या मान्यवरानी एकत्र येत प्रति व्यक्ती जीवनावश्यक वस्तू, कपडे, अंथरूण, पांघरूण यासाठी प्रत्येक व्यक्ती पाच हजार रुपये अशी रोख स्वरूपातील मदत या कुटुंबातील २१ व्यक्तींना सोमवारी सायंकाळी दिली. ही मदत भाजपच्या वतीने करण्यात आली. याशिवाय रविवारी रात्री भाजपाचे नेते निलेश राणे यांनी संबंधितांना भेट देवून मदत केली होती. यासोबत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने गरजूंना गॅस शेगडी व संसारपयोगी भांडी यांचीही मदत उद्या केली जाईल असेही सांगण्यात आले.
भाजप नेते खासदार नारायण राणे यानी सोमवारी पूरबाधितांची भेट घेत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या पुर परिस्थितीची दखल घेत अधिवेशन काळातून संपर्क साधला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी माणुसकीच्या दृष्टीने या कठीण प्रसंगी मदत कार्य करावे व या कुटुंबांना धीर द्यावा. शासकीय पातळीवरील मदत तातडीने पोचेल. पण आपल्या कार्यकर्त्यांनी या कुटुंबांना आधार द्यावा अशा सूचना ना. रवींद्र चव्हाण यांनी दिल्याचेही प्रभाकर सावंत म्हणाले. यावेळी ओरोस मधील मान्यवर नागरिक, पूरग्रस्त मंडळी तसेच रोटरीचे नवीन बांदेकर, अरुण मालणकर आदी उपस्थित होते.