मंदिरात नाही, माणसात देव शोधला ; विशाल परब त्यातलाच एक : निलेश राणेंचे गौरवोद्गार
येणारा काळ तुमचाच ; २०२४ नंतर सिंधुदुर्गात राणे कुटुंबच असेल : विशाल परब यांचा विश्वास
भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा ; परब यांच्या कार्याचा गौरव
कुणाल मांजरेकर
सावंतवाडी : भाजपचे युवा नेते, उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस शुक्रवारी रात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी या कौटुंबिक सोहळ्यास विशेष उपस्थिती दर्शवली. दरम्यान, मी मंदिरात कधीच देव शोधला नाही, तर माणसातच देव शोधला आहे. विशाल परब यातीलच एक आहे. माझ्या पडत्या काळात अनेकांनी माझी साथ सोडली, मात्र विशाल नेहमीच एका भावाप्रमाणेच माझ्या पाठीशी राहिल्याचे उद्गार निलेश राणे यांनी काढले. तर माझ्या निलेश साहेबांनी मला घडवले, मी त्यांचा सैनिक आहे. आणि आयुष्यभर सैनिकच राहणार. माझ्या मोठ्या भावाला कोणत्या तरी पदावर बसवण्याचे माझे ध्येय आहे. येणारा काळ माझ्या साहेबांचा आहे. २०२४ नंतर जिल्ह्यात राणे कुटुंबच असेल, असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला.
भाजपचे युवा नेते उद्योजक विशाल यांचा वाढदिवस माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब, अशोक राणे, आनंद शिरवलकर, दादा साईल, डॉ. मिलींद कुलकर्णी, मोहन सावंत, सौ. वेदिका परब, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, राजू राऊळ, विनायक राणे, प्रकाश मोर्ये, भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी सभापती राजन जाधव, तेजस माने, रविंद्र परब, ॲड. अनिल निरवडेकर, नकुल पार्सेकर, माजी सभापती मानसी धुरी, किरण तावडे, आनंद परब, अमृता परब, महादेव परब, मानसी परब, रविंद्र परब, आनंदी परब, कु. भार्गवी, विराज, कौस्तुभ आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, डॉ. मिलींद कुलकर्णी, डॉ. बाळकृष्ण सावंत, डॉ. रेवण खटावकर, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. दर्शेश पेठे, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, पणदूर सरपंच दादा साईल, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, देवेंद्र सामंत या कोविड योद्ध्यांचा निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड झाल्याबद्दल क्रिकेटपटू शांताराम परब, रघुनाथ पेडणेकर, प्रकाश ठाकूर यांचाही यावेळी निलेश राणेंच्या हस्ते सन्मान करण्यात आले. विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड यांनी दिलेल्या शुभेच्छा व दृकश्राव्य माध्यमातून विशाल परब यांचा जिवनपट यावेळी सादर करण्यात आले. विशाल परब मित्र मंडळातर्फे प्रतिमा भेट देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी शेकडो नागरीकांनी त्यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले. यावेळी दिल्ली वरून आलेले विशाल परब यांचे मित्र किरण तावडे यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दादा साईल यांनी केले. सूत्रसंचालन श्री. वालावलकर यांनी केले तर मोहन सावंत यांनी आभार मानले.
विशाल परब पारदर्शक व्यक्तिमत्त्व : निलेश राणे
यावेळी निलेश राणे म्हणाले, राजकारणात मी अनेक चांगले वाईट दिवस पाहिले. चांगल्या व्यक्ती बदललेल्या मी पाहिल्या. पण विशाल याला अपवाद आहे. राणेसाहेब निवडणुकीत जिंकले काय आणि हरले काय, त्याला कधी फरक पडला नाही. विशाल आज उद्योगात मोठा झाला आहे. पण त्याने जे कमावलं ते सहज नाही, त्यासाठी त्याने केलेले कष्ट मी जवळून पाहिले आहेत. विशाल हा पारदर्शक माणूस आहे. जे आहे ते समोर. दुसऱ्यासाठी झटणारा हा माणूस आहे. मी नशीबवान आहे, मला विशाल सारखा मित्र भेटला. विशालला अजून खूप मोठं व्हायचं आहे. अजून मोठं ध्येय गाठायचं आहे. त्याने आपण राजकारणात येणार नाही, म्हणून सांगितलं आहे, पण वेळ आली तर स्वतःच काय चालत नाही, असं सांगून विशालने आपली प्रगती अशीच कायम ठेवावी, परमेश्वर त्याच्या निश्चितच पाठीशी आहे, असं निलेश राणे म्हणाले.
विशाल परब हे चंदनासारखे झिजणारे व्यक्तीमत्व : संजू परब
सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी विशाल परब यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यकर्ता कसा जपावा हे निलेश राणेंकडून शिकावं. सकाळी ते सावंतवाडी मध्ये शिवपुतळ्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर रात्री पुन्हा एकदा विशालच्या वाढदिवसासाठी आले, यावरून विशालवरील त्यांचे प्रेम दिसून येते. विशाल देखील त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो. त्याला कोणतीही निवडणूक लढवायची नाही, त्याला फक्त निलेश साहेबांसाठी झटायचं आहे. चंदनासारखं दुसऱ्यांसाठी झटणारे नेतृत्व म्हणजे विशाल परब असल्याचे गौरवोद्गार संजू परब यांनी काढले.
विशाल, २०२४ साठी ताकद जपून ठेव : डॉ. मिलिंद कुलकर्णी
विशाल परब हे राणेंच्या सुखदुःखामध्ये सावली सारखं उभं राहणारं व्यक्तिमत्त्व आहे. निलेश राणेंनी फार कमी माणसं जोडली. मात्र जी जोडली, ती विशाल परब सारखी. ही माणसं कधीच निलेशजी ना सोडून दूर जाऊ शकत नाहीत. विशाल हा मैत्री जपणारा माणूस आहे. पण माझं विशालला एकच सांगणे आहे, तुझी जी काही ताकद आहे, ती आता खर्च करू नको, ही ताकद २०२४ साठी जपून ठेव. आपल्याला २०२४ मध्ये एक चमत्कार घडवायचा आहे. निलेश राणेंना सभागृहात विधिमंडळ पाठवायचं आहे. आज दसरा आहे, पण आपल्याला २०२४ चं सीमोल्लंघन करायचं आहे, असं डॉ. मिलिंद कुलकर्णी म्हणाले.