मालवण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचाही राजीनामा !
चार महिने पगार नसल्याने उपासमार होत असल्याची खंत
कुणाल मांजरेकर
मालवण : कोरोना काळात विविध प्रकारच्या मशिनरी आणि पीपीई किट साठी कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या आरोग्य खात्याकडे कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनासाठी पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयातील १७ पैकी १६ डॉक्टरनी चार महिने पगार नसल्याने राजीनामा दिल्याचे वृत्त काल समोर आले होते. या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल चंद्रकांत साळुंखे यांनीही चार महिन्यांचा पगार नसल्याने राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पगार न मिळाल्याने आपल्या कुटुंबाची उपासमार होत असल्याचे डॉ. साळुंखे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राजीनाम्या वरून नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रुजु झालेल्या १७ पैकी १६ वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाकडे आपले राजीनामे दिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अद्यापही पूर्णपुणे नियंत्रणात नसून दर दिवशी ५० च्या आसपास नवीन रुग्ण आढळत असून काही रूग्णांचे मृत्यू देखील होत आहेत. कोरोना कालावधीमध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना जर वेळेवर मानधन मिळत नसेल तर त्यांच्याकडून सेवेची अपेक्षा तरी कशी करायची असा सवाल करून जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असून महाविकास आघाडी सरकारने या जिल्ह्याची यंत्रणा व्हेंटिलेटरवर नेऊन ठेवल्याचा आरोप रणजित देसाई यांनी केला होता. बहुचर्चित असलेले वैद्यकीय महाविद्यालय होईल तेव्हा होईल परंतु सध्या जनतेला आवश्यक असणारी आरोग्य यंत्रणा तरी सुधारा असे आवाहन देखील त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मालवण ग्रामीण रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉ. प्रफुल्ल साळुंखे यांनीही राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
काय म्हटलंय राजीनामा पत्रात ?
डॉ. प्रफुल्ल साळुंखे यांचे राजीनामा पत्र समोर आले आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी डॉ. प्रफुल्ल चंद्रकांत साळुंखे एमबीबीएस बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी वर्ग २ या पदावर ३ मे २०२१ पासून रुजू झालो. परंतु माझा चार महिन्यांचा (जून ते सप्टेंबर) पगार नाही. कोरोनाच्या लाटेत सतत २४ तास काम करत असून सुद्धा सरकार माझा पगार देण्यात असमर्थ ठरत आहे. वारंवार मागणी करून सुद्धा माझा पगार झाला नाही. त्यामुळे शेवटी माझ्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला कंटाळून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे डॉ. साळुंखे यांनी म्हटले आहे.