कोकणी माणसाची बदनामी करताना लाज कशी वाटत नाही ?
भाजपा नेते निलेश राणेंचा माजी खा. विनायक राऊत यांना सवाल
मालवण | कुणाल मांजरेकर
खासदार नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटून विजय मिळवल्याचा आरोप करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे.
याबाबत आपल्या एक्स अकाउंट वरून केलेल्या पोस्ट मध्ये निलेश राणे यांनी म्हटले आहे की, कोकणी माणूस कधी सरकारकडे कर्जमाफी मागत नाही. कुठल्या बँकेचे कर्ज बुडवत नाही तो स्वाभिमानी कोकणी पैशाने विकला जाईल का? कोकणी मतदारांची बदनामी करताना विनायक राऊताला लाज वाटायला हवी होती. मुंबईत पण मराठी माणसाने उबाठा सेनेकडे पाठ फिरवली. मुंबईत लालबाग परेल भांडुप दादर चा मराठी कोकणी माणूस आज तुमच्यासोबत राहिला नाही. याचे आधी आत्मचिंतन करा. कोकणी माणूस आपल्यापासून का दुरावला याचा कधी अभ्यास करा. जर असाच कोकणी माणसाचा तुम्ही अपमान केलात तर आज एका निवडणुकीत तुम्हाला पाडले, तोंड आवरा नाहीतर यापुढील प्रत्येक निवडणुकीत कोकणी माणूस तुमची लायकी दाखवल्याशिवाय राहणार नाही.