महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता !

नितीन वाळके यांचा आरोप ; व्यापारी महासंघाने वीज ग्राहकांच्या वतीने पाठवलेली नोटीस आली परत

मालवण | कुणाल मांजरेकर

महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग कार्यालय बेपत्ता झाल्याचा आरोप व्यापारी महासंघाचे जिल्हा सचिव नितीन वाळके यांनी केला आहे. वीज ग्राहक संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग अधिक्षक अभियंता विनोद पाटील यांच्यावर २४ मे रोजी जाहीर नोटीस कंपनीच्या अधिकृत वाॅटसअप व इमेल द्वारे बजावलेली होती. याच नोटीसीची छापील प्रत अधिक्षक अभियंता या अधिकारात विनोद पाटील यांना रजिस्टर एडी करून पोष्टाने कंपनीच्या कुडाळ एमआयडीसी येथील अधिकृत पत्त्यावर २८ मे रोजी बजावणीसाठी पाठलेली होती. त्याप्रमाणे टपाल कार्यालयाने ही नोटीस नमुद पत्त्यावर २९ व ३० मे असे दोन दिवस बजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिक्षक अभियंता गैरहजर असा शेरा मारून हे दोन्ही दिवस ही नोटीस कार्यालया कडून परत पाठविण्यात आली असल्याने हे कार्यालय बेपत्ता झाल्याचा आरोप श्री. वाळके यांनी केला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. वाळके यांनी म्हटले आहे की,  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरण कंपनीच्या गोंधळी व बेजबाबदार कारभाराचा पंचनामा सध्या जवळपास संपुर्ण जिल्ह्यात सुरू आहे. याबाबत सातत्याने सर्वच प्रसारमाध्यमातून रोज विविध ठिकाणाहून वीज ग्राहकांनी आवाज उठवल्याच्या बातम्यांचा ओघ थांबतच नाही आहे. जिल्हा वीज ग्राहक संघटनेने महावितरणच्या बेजबाबदार कारभारा विरोधात आवाज उठवल्या नंतर सर्वच राजकीय पक्षांनीही या जनआक्रोशाची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहेच. याबाबत वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने महावितरण कंपनीचे सिंधुदुर्ग अधिक्षक अभियंता मा.विनोद पाटील यांना रजिस्टर एडी पोस्टांने जाहीर नोटीस बजावली होती. टपाल खात्याच्या नियमानुसार एक आठवडा वाट पाहून सदरची नोटीस स्विकारण्यास महावितरण कंपनी कडून कोणीही व्यक्ती न आल्याने अनक्लेम्ड अशा शेऱ्यासह ही नोटीस महासंघाकडे १० जून रोजी परत पाठवली आहे.

याचाच अर्थ असा की एकतर अधिक्षक अभियंता आपला पदभार हस्तांतरीत न करता २९ मे पासून ९ जूनपर्यंत आपल्या कामावर गैरहजर आहेत किंवा महावितरणचे कुडाळ मुख्यालयच बेपत्ता झाले आहे,असा होतो. महासंघाने बजावलेली नोटीस सिंधुदुर्ग महावितरणच्या अधिक्षक अभियंत्याना न पोहोचल्याने आता हीच नोटीस महावितरणच्या प्रकाशगड येथील मुख्यकार्यालयावर बजावणीसाठी पाठवण्याचा निर्णय वीज ग्राहक संघटनेने घेतला आहे. याचबरोबर येत्या शुक्रवारी जिल्ह्यातील सुमारे चार लक्ष वीज ग्राहकांच्या वतीने जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ महावितरण कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांची भेट घेणार आहे. त्यांनाही महावितरण सिंधुदुर्गचे कार्यालय बेपत्ता झाल्या बाबत अवगत करण्यात येणार आहे, असे श्री. वाळके यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!