बोर्डिंग मैदानावरील “तो” हायमास्ट टॉवर सहा महिन्यानंतरही जमिनीवर धूळखात पडून !
महेश कांदळगावकर यांनी वेधले लक्ष ; पावसाळा सुरु होण्यापूर्वी पुन्हा न बसवल्यास पालिकेचा ७ लाखांचा बसणार फटका
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरात टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर पालिकेच्या वतीने बसवण्यात आलेला हायमास्ट टॉवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ४ डिसेंबर रोजीच्या मालवण दौऱ्यावेळी सुरक्षिततेच्या कारणास्तव उतरवण्यात आला होता. मात्र सहा महिने उलटूनही हा हायमास्ट टॉवर पालिकेकडून बसवण्यात आलेला नाही. सुमारे सात लाख खर्च करुन लावलेला हा हायमास्ट प्रशासनाच्या दिरंगाई बोर्डिग ग्राउंड येथे धूळखात जमिनीवर पडला आहे. येत्या काही कालावधीत पावसाळा सुरु होणार आहे. त्यापूर्वी हा हायमास्ट टॉवर पुन्हा उभा न केल्यास पालिकेचे सात लाखांचे नुकसान होण्याची भीती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यक्त करीत पालिका प्रशासकाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरातील बोर्डिंग मैदानावर याठिकाणी संध्याकाळी चालण्याच्या व्यायामासाठी जेष्ठ नागरिक, मुले येत असतात. त्यामुळे या ठिकाणी पुरेसा प्रकाश असावा या उद्देशाने टोपीवाला हायस्कूलच्या मागणी प्रमाणे आमच्या कालावधीत हायमास्ट बसविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ४ डिसेंबर २०२३ रोजी नेव्ही डे च्या निमित्ताने मालवण या ठिकाणी आले होते. त्यांचे आगमन मालवणच्या बोर्डिग ग्राउंड येथे हेलिकॉप्टरने झाले होते. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेलिकॉप्टर लँडिंगला अडथळा होणारा हा हायमास्ट मालवण नगरपरिषदेने तात्पुरत्या स्वरूपात काढून ठेवला होता. आता पंतप्रधान यांचा दौरा होवून जवळपास सहा महिन्याचा कालावधी होत आला आहे पण अजुनही तो हायमास्ट पुन्हा लावण्याबाबत कुठलीही कार्यवाही मालवण नगरपरिषदेकडून झालेली नाही .
पावसाळा नजीक येवून ठेपला आहे. त्याच्या अगोदर हा हायमास्ट पुनर्स्थापित झाला नाही तर तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासकीय कालावधीत प्रशासकाच्या अश्याच दिरंगाईमुळे खत मशीन, बायो टॉयलेट गाड्या, पिंपळ पार येथील रंगीत कारंजा, व्यापारी गाळे अश्या स्थावर आणि जंगम मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान यापूर्वीच झाले आहे. आणि त्यात आता या हायमास्टची भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे.