पालकमंत्र्यांचं संवेदनशील पालकत्व ; मधमाशीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीचा हात

पांग्रड येथील लवु साळसकर यांच्या कुटुंबियांना भाजपाच्या वतीने एक लाखाची आर्थिक मदत

कुणाल मांजरेकर | सिंधुदुर्ग

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संवेदनशील पालकत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. पांग्रड येथील लवु साळसकर यांचा दोन दिवसांपूर्वी पांग्रड, नागमाचे टेम्ब येथे धार्मिक कार्यक्रमाच्या दरम्यान मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच अन्य सुमारे ४० ग्रामस्थ जखमी झाले होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या मार्फत साळसकर कुटुंबियांना एक लाखांची आर्थिक मदत सुपूर्द केली. या हल्ल्यात जखमी झालेल्या अन्य नागरिकांची देखील विचारपूस करून त्यांना प्रशासनाच्या वतीने लागणारे सहकार्य करण्याची हमी पालकमंत्र्यांच्या वतीने यावेळी देण्यात आली.

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या नातेवाईकांची आणि जखमींची विचारपूस करून आर्थिक मदत करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार प्रभाकर सावंत यांनी प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.संध्या तेरसे, भाई सावंत, तालुकाध्यक्ष दादा साईल, माजी सभापती किशोर मर्गज, निरुखे सरपंच किर्तीकुमार तेरसे, अमोल मर्गज यांच्यासह पांग्रड नागमाचे टेम्ब येथील मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लवु साळसकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. मयत साळसकर यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा अंतर्गत मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी मयत लवू नारायण साळसकर यांची पत्नी ललिता लऊ साळसकर, मुलगा सागर लवू  साळसकर, मुलगी वर्षा लवू साळसकर, विवाहित मुलगी मनाली संतोष चव्हाण, भाऊ मधुकर नारायण साळसकर तसेच सुनील मर्गज, अमोल पांग्रडकर, भालचंद्र मर्गज, प्रमोद जाधव, गजानन पांग्रडकर, आनंद कुंभार, नारायण माणगावकर, काशीराम राणे, सुशील जाधव, संतोष चव्हाण, श्याम माणगावकर, गणेश राणे आणि अन्य ग्रामस्थ तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री यांच्या संवेदनशील वृत्तीसाठी उपस्थित ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3844

Leave a Reply

error: Content is protected !!