सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अभिनंदनीय यश ; ३००० कोटी ठेवींचा टप्पा केला पार
सव्वा दोन वर्षात तब्बल ७४० कोटींच्या ठेवी ; मार्च २०२५ अखेर ६००० कोटींचा व्यवसाय करण्याचे बँकेचे नव्याने उद्दिष्ट
महिलांच्या हाताला काम देण्यासाठी नाविन्यपूर्ण कर्ज योजना आणणार : बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे गेल्या ३८ वर्षात २२६० कोटी ठेवी होत्या. बँकेने मागील सव्वा दोन वर्षात ७४० कोटी ठेवींची ऐतिहासिक वाढ करून ३००० कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे. जिल्हा बँकेने जिल्हावासीय ग्राहकांच्या मनात एक भक्कम विश्वास निर्माण केला असून बँकेच्या संचालक मंडळाने केलेले काम, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत व वरिष्ठानी दाखवलेला विश्वास यामुळेच ही बँक प्रगतीच्या शिखरावर आहे. या वर्षात महिलांसाठी नाविन्यपूर्ण कर्ज योजना व मार्च २०२५ अखेर या बँकेचा व्यवसाय ६००० कोटीवर नेण्याचा निर्धार जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामामुळे गेल्या सव्वा दोन वर्षात ठेवी, कर्ज व्यवहार, बँकेचे उलाढाल, बँकेचा नफा या सर्वच व्यवहारात ही जिल्हा बँक राज्यात अग्रणी राहिली आहे. सहकार क्षेत्रातील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हा बँकांमध्ये राज्यात पहिल्या तीन क्रमांकात सिंधुदुर्ग जिल्हा बँक आहे व या प्रगतीमध्ये जिल्ह्यातील ग्राहकांचा व जिल्हावासीय नागरिकांचा मोठा वाटा आहे. असेही मनीष दळवी म्हणाले. या पत्रकार परिषदेवेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे, जिल्हा मजूर फेडरेशन अध्यक्ष तथा संचालक विठ्ठल देसाई, श्रीम.प्रज्ञा ढवण, व्हीक्टर डॉन्टस, महेश सारंग, विद्याधर परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून, या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह RTGS/NEFT, ATM, Mobile App, IMPS, UPI, E-com, QR-Code, ABPS, BBPS, Micro ATM, CTS, E-mail Account Statement इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा बँकेने नुकत्याच संपलेल्या सन २०२३-२४ या आर्थिक वर्ष अखेर बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे.
चालू सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये बँकेने ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, ढोबळ नफा या सर्वच बाबतीत नविन उद्दिष्टे गाठण्याचा संकल्प केलेला असून त्यादृष्टीने सक्षमपणे वाटचाल सुरू केलेली आहे. बँकेचा व्यवसाय ३१ मार्च, २०२५ अखेर रू.६००० कोटींच्यावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बँकेवरील ग्राहकांचा व एकंदरितच जिल्हा वासियांचा बँकेवरील विश्वास व त्यांच्या सहकार्यामुळे बँक सर्व उद्दिष्टे चालू आर्थिक वर्षामध्येही नक्कीच गाठेल याचा आम्हाला विश्वास आहे. याच दृष्टीने बँकेची वाटचाल सुरू झालेली असून चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्याच महिन्यामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवडयात बँकेने रू. ३००० कोटींचा ठेवींचा टप्पा ओलांडलेला आहे, तसेच बँकेचे वसुल भागभांडवलही रू.५० कोटींपेक्षा जास्त झालेले आहे. ३१ मार्च २०२५ अखेर म्हणजेच चालू आर्थिक वर्ष अखेर रू. ३३०० कोटींचे ठेव उद्दिष्ट गाठण्याचा बँकेचा मानस असून जिल्हयातील वैयक्तिक तसेच संस्था ठेवीदारांच्या सहकार्याने बँक सदर उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करेल असा बँकेस विश्वास आहे.
बँकेकडून ग्राहकांना सेव्हिंग, करंट, मुदतठेव, हरियाली, अल्पबचत दैनंदिन ठेव, आवर्तक ठेव, सदाफुली ठेव, विदयार्थ्यांसाठी विदयाधन व ज्ञानदा ठेव इ. विविध ठेव योजना ग्राहकांच्या गरजा विचारात घेवून पुरविण्यात येत आहेत. बँकेच्या ठेवीचे व्याजदरही अन्य राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांच्या तुलनेत ०.५०% ते १% पर्यंत जादा आहेत. बँकेच्या विविध योजनांना ग्राहकांकडून नियमितपणे चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ठेव वाढीस चालना मिळत आहे.
साडेसहा लाख खातेदार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने बँकेच्या खातेदारांना बँकिंग सुविधा सुलभपणे उपलब्ध करून दिले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांसारखा अद्यावत डिजिटल प्लॅटफॉर्म या बँकेने ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यातील बँकेच्या 98 शाखा मार्फत जवळपास साडेसहा लाख खातेदारांना ही बँक बँकिंग सेवा पुरवीत आहे. रिझर्व बँकेच्या नियमानुसार ऍक्टिव्ह नसलेल्या खातेदारांनाही एक मोहीम राबवून ऍक्टिव्ह केले जाईल त्यांनाही बँकिंग सेवा पुरविली जाईल असेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.