कोकण पदवीधर मतदार संघातून वैभव खेडेकर यांना उमेदवारी द्या
मनसेचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार ; गणेश वाईरकर यांची माहिती
मालवण : कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या १० जून रोजी होणार आहे. या मतदार संघातून मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र सैनिकांमधून होत आहे. याबाबत मनसेचे सर्व पदाधिकारी आणि मनसैनिक राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांची भेट घेऊन कोकण पदवीधर मतदार संघातून उच्चशिक्षित उमेदवार म्हणून वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती करणार असल्याची माहिती मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी दिली आहे.
एक उच्चशिक्षित आणि सुशिक्षित बेरोजगारीकडे विशेष लक्ष देण्यासाठी एक तरुण नेतृत्व म्हणून श्री वैभव खेडेकर यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. आज अनेक तरुण तरुणी पदवीधर असून बेकार आहेत. राजसाहेब आणि अमितसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून बेकारीचा प्रश्न मनसे कडून नक्कीच सोडवला जाईल. यासाठीच उच्चशिक्षित उमेदवार म्हणून वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी अशी विनंती आम्ही सर्व पदाधिकारी राजसाहेब आणि अमित ठाकरे यांची भेट घेऊन करणार आहोत. कोकण पदवीधर मतदारसंघातून श्री वैभव खेडेकर नक्कीच विजयी होतील, असा विश्वास श्री. गणेश वाईरकर यांनी व्यक्त केला.