दोन वाड्यांच्या मध्ये क्रशर ; आता डांबर प्लांट मंजुरीच्या प्रतीक्षेत ; ओवळीये गावातील प्रकार
ग्रामस्थांचा तीव्र विरोध ; ग्रामस्थांचा विरोध असेल तर मान्यता देऊ नये – सुनील घाडीगांवकर यांनी केले स्पष्ट
मालवण : कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील ओवळीये गावात डांबर प्लांट मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्लांटला येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. डांबर प्लांट पर्यावरण व आरोग्यास हानिकारक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत ग्रामसभेत देखील विरोधाचे ठराव घेण्यात आले आहेत. या गावातील परब टेंबवाडी, कूळकरवाडी या दोन्ही वाडीच्या मध्येच क्रशर आहे. त्याचा ग्रामस्थ आणि पर्यावरणाला आधीच त्रास होत असून आता याच ठिकाणी डांबर प्लांट उभारल्यास ग्रामस्थ आणि वस्तीला अधिक त्रास होणार आहे, त्यामुळे ग्रामस्थांचा विरोध असेल तर हा डांबर प्लांटला मंजुरी देण्यात येऊ नये, अशी आमचीही भूमिका असल्याची माहिती पं. स. चे माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी दिली आहे.
ओवळीये ग्रामपंचायतच्या मागील ग्रामसभेत चर्चेत ठेवण्यात आलेल्या विषयात प्रसाद लक्ष्मण आंगणे यांना डांबर प्लांट/बॅच मिक्स प्लांट बसविण्यासाठी नाहरकत दाखला देणेबाबतच्या अर्जाचे वाचन सभागृहात करण्यात आले. त्याच बरोबर परब टेंबवाडी/कूळकरवाडी येथील ग्रामस्थांचा विरोधाचा अर्ज ग्रामसभेसमोर वाचण्यात आला. दोन्ही अर्जाचे वाचन करून झाल्यावर सदरील प्रकल्प पर्यावरण व आरोग्यास हानीकारक असल्याने नाहरकत ग्रामपंचायतीने देवू नये असे सुचविण्यात आले. त्यानंतर प्रसाद लक्ष्मण आंगणे यांनी सदरील प्रकल्प हा पर्यावरण व आरोग्यास हानीकारक आहे हे ग्रामस्थ ठरवु शकत नाहीत तेव्हा तुम्ही सांगावे. असा प्रश्न सभागृहाच्या समोर उपस्थित केला. त्यावर सभा अध्यक्ष व सचिव यांनी सदरील प्रकल्प आरोग्यास हानिकारक आहे असे आरोग्य विभाग व वरीष्ठ कार्यालय ठरवू शकतात. परंतु ग्रामस्थांचा विरोध असल्याने सदरील प्रकल्पास नाहरकत देण्यात येवू नये असे सभागृहात बहुमताने ठरल्याचे स्पष्ट केले.
या निर्णयाबाबत संबंधित अर्जदार यांनी पंचायत समिती स्तरावर अपील केल्यानंतर त्यावर सुनावणी प्रक्रिया सूरू आहे. दोन्ही बाजूकडून याबाबत बाजू मांडली जाईल. मात्र आम्ही ग्रामस्थ यांच्या विरोधी भूमिके सोबत ठाम आहोत. डांबर प्लांटला आमचा विरोधच राहील. अशी भुमिका माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी मांडली आहे.