प्रज्वल प्रभूंचे पदच बोगस ; युवासेना विभागप्रमुख पद भाजपने स्वतःच ठरवून प्रवेशापुरते दिले
युवासेना विभाग प्रमुख वंदेश ढोलम यांची माहिती ; प्रज्वल प्रभू ठाकरे गटात सक्रियच नसल्याचा दावा
मालवण : युवासेनेचे पेंडूर विभागप्रमुख असलेल्या प्रज्वल प्रभू यांनी चार दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. या प्रवेशाबाबत युवा सेना विभागप्रमुख वंदेश ढोलम यांनी खुलासा केला आहे. प्रज्वल प्रभू हे मुळात शिवसेना ठाकरे गटात सक्रिय राहून काम करतच नव्हते. त्यामुळे ते विभाग प्रमुख अथवा अन्य कोणत्याही पदावर असल्याचा प्रश्नच येत नाही. त्यांचा शिवसेना ठाकरे गटाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. मी स्वतः युवासेनेचा पेंडूर जि. प. मतदार संघाचा आजपर्यंत सक्रिय विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मग हे प्रभू होते कुठे ? कदाचित भाजपने प्रज्वल प्रभू यांना प्रवेशापुरते विभागप्रमुख पद दिले असावे. भाजपचे या भागातील काही पदाधिकारी यांनी आपल्या नेत्यांकडून शाबासकी मिळविण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. त्यात त्यांना शाबासकी मिळाली असेलही परंतु त्याचा आम्हाला कोणताही फरक पडत नाही, असे वंदेश ढोलम यांनी म्हटले आहे.
याबाबत त्यांनी म्हटले आहे की, पेंडूर जि. प. मतदार संघाच्या कट्टा येथे झालेल्या भाजपच्या युवा मेळाव्यात काळसे येथील प्रज्वल प्रभू या युवकाने आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला अशी बातमी प्रसिध्दी माध्यमांमधून समजली. त्यात प्रभू यांचा शिवसेनेचे युवासेना विभागप्रमुख म्हणून उल्लेख करण्यात आला. आमच्या पक्षात सक्रिय नसलेल्याना स्वतःच्या मनाने पदे देऊन पक्ष प्रवेश दाखवण्याची केविलवाणी अवस्था भाजपची झाली आहे. जर प्रज्वल प्रभू विभाग प्रमुख होते तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, तो कुणाकडे दिला ते अगोदर स्पष्ट करावे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आमच्या पक्षाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. त्यामुळे आज इकडे आणि उद्या तिकडे अशी भूमिका असणारे कुठेही जावो आम्ही यावर कधीही अवलंबून नव्हतो. आणि असे इकडे तिकडे करणारे कार्यकर्ते हे आमच्या हिशेबातच नाहीत. आमच्या कडे आहेत ते कडवट आणि निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्याच्या जोरावर आम्ही टिकणार आणि लढणार असेही वंदेश ढोलम यांनी स्पष्ट केले आहे.