सुरेश प्रभू माझे गुरु ; गुरुची सेवा करण्यात लाज कसली ? केनवडेकरांचा खोबरेकरांना सवाल
तुम्ही जेव्हा राजकारणातही नव्हता, तेव्हापासून मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेच्या प्रचारात
शिवसेनेबरोबर प्रचार केला म्हणून घरावर दगडफेक ; त्यावेळी विचारपूस करणारे राणेसाहेब एकमेव नेते
“नेव्ही डे” चा कार्यक्रम मालवणात होणे गौरवाचा क्षण असताना त्यामध्ये नको तो अर्थ काढणे म्हणजे विरोधकांच्या पोटात आलेला पोटशूळ
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केलेल्या व्यक्तिगत आरोपांवर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हरी खोबरेकर यांनी माझ्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी केली आहे. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे आम्ही कधीपण टाळत असतो. सुरेश प्रभू हे माझे गुरु आहेत. गुरुंची सेवा करणे यात मला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही, आणि वाटणारही नाही, असे सांगून २०१४, २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर १९९० सालाच्या निवडणुकीपासून माझ्या वार्डमध्ये, माझ्या बुथवर शिवसेनेला टेबल लावायला माणूस मिळत नव्हता व पोलीग एजंट बसायला प्रतिनिधी मिळत नव्हता, त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या ठिकाणी बूथवर टेबल लावत होतो. घरोघरी जाऊन प्रचार करत होतो. त्यावेळी आपण राजकारणातही नव्हता. शिवसेनेबरोबर प्रचार केला म्हणून माझ्या घरावर पण दगडफेक झाली होती. त्यात माझे वडील जखमी झाले होते. त्यावेळी नारायण राणेसाहेब एकमेव नेते माझी विचारपूस करण्यासाठी आले होते. आम्ही काय प्रचार केला ते. आपण सांगण्याची काही जरुरी नाही. पण आपण कोणाची सेवा करत असता हे पूर्णपणे जगजाहीर आहे. गुरुची सेवा करत असताना कधी मागच्या दाराने पळून जाण्याची माझ्यावर नामुष्की आली नाही, असे श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. केनवडेकर यांनी पुढे म्हटले आहे की, राजकोटचा किल्ला पुनर्जीवित झाला त्याचे पूर्ण श्रेय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांना जाते. पत्रकार परिषदेमध्ये आपल्या बरोबर बसून टीकाटीपणी करणारे जेष्ठ कार्यकर्ते यांना ज्यावेळी व्यापारी संघाची सभा असते त्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम झाले पाहिजेत म्हणून जाहीर वक्तव्य करायची. दुसऱ्या बाजूला राज्यातील देशाचे प्रश्न घेऊन टीकाटिपणी करावी हे कितीसे योग्य आहे हे आपणच पहावे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे कोणीही महत्त्व कमी करू शकत नाही आणि होऊ शकत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ही सिंधुदुर्ग किल्ला होती. हे जग जाहीर असल्यामुळे छत्रपतींचे मंदिर या ठिकाणी असल्यामुळे लोक तीर्थक्षेत्रच म्हणून या किल्ल्याकडे पहात असतात याची पूर्ण जाणीव भारतीय जनता पार्टीला आहे. पण ह्याच किल्ल्याच्या रक्षणासाठी आवश्यक ३२ गड महाराजांनी बांधले होते त्याचे पुनर्जीवीकरण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करत आहे. अशी ऐतिहासिक स्थळे पर्यटनदृष्ट्या विकसित झाल्यानंतर गावोगावी पर्यटन उभे राहील. आर्थिक सुबकतेकडे सिंधुदुर्ग जिल्हा मार्गस्थ करण्याचा प्रयत्न पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होत असताना जिल्हा पाहत आहे.
नितीन वाळकेंकडून द्विधा मनःस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न
कोकणपट्टा सिडकोकडे देऊन अंबानी, अदानीच्या घशात कोकण घालवयाचे आहे का ? प्रंतप्रधान याची रेकी करण्यासाठी कोकणात आले होते का? असा प्रश्न विचारून द्विधा मनस्थिती करण्याचा नितीन वाळके प्रयत्न करत आहेत. अशा किती जमिनी कोकणातल्या अंबानी अदानीच्या घशात घातल्या याचे स्पष्टीकरण यांनी द्यावे. सिडकोच्या प्रस्तावाला पूर्णपणे महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिलेली आहे. या संदर्भातली कोणतीही कारवाई न होता अकलेचे तारे तोडणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.
देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांचा दौरा नेव्ही डेच्या निमित्ताने झाला. राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल चुकवून झाला अशी टीकाटिपणी करून द्विधा मनस्थिती करणे हे चुकीचे असून अशा प्रकारचा खेद किंवा टिपणी कोणताही नेता करत नसताना अशी टीकाटिपणी करणे हे चुकीचे आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी आचरा, देवगड, मिठबाव, विजयदुर्ग अशा गावांची नावे स्पष्टपणे आपल्या भाषणात घेतली याचा अर्थ वेगळा काढणे चुकीचे आहे. नेव्ही डे चा कार्यक्रम मालवण मध्ये होणे हे गौरवाचे असताना भारत देश कसा बलशाही आहे हे दाखवणारे प्रात्यक्षिक असताना याला नको तो अर्थ काढणे म्हणजे विरोधकांच्या पोटात पोटखूळ आल्यासारखे आहे.
२०१९ निवडणुकीमध्ये मालवण वायंगणी, कुंभारमाठ, देवली, चिपी विमानतळ भागातील पूर्ण जमिनी आरक्षित करून ताब्यात घेतल्या, भूमिगत देशोधडीला लावले, नाणार प्रकल्पाला जमिनी घेतल्या, असे राजकारण करून गोरगरिब जनतेला पूर्ण विचलित करण्याचे फक्त काम विरोधक करत आहेत. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यामध्ये आरक्षित केलेली जागा व्यतिरिक्त अतिरिक्त कुठली जागा आरक्षित करून स्वतःच्या घशात घातली याचे एक तरी उदाहरण विरोधकांनी द्यावे. मुंबई गोवा महामार्गावरील सर्वात जास्त जमिनीचा मोबदला मिळाला असेल तर विरोधकांच्या लोकप्रतिनिधीलाच मिळालेला आहे. याची माहिती पहिल्यांदा घ्यावी.
कोकणात रिफायनरी नको असे ठणकावून सांगणारे विरोधक गुजरात मधील अंबानीच्या रिफायनरी येथे होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित दाखवतात याला जनतेने काय म्हणावे… असा सवाल विजय केनवडेकर यांनी केला आहे.
सिंधुदुर्ग किल्ल्याला आवश्यक असणारा निधी पालकमंत्री यांनी विशेष बाब म्हणून मंजूर करून घेतला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला प्रवेशद्वार ते बुरुज याला पूर्ण लाईट व्हावी. पडलेले बुरुज व्यवस्थित करण्यात यावे. यासाठी भरीव निधी उपलब्ध केला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शिवराजेश्वर मंदिर, नगारखाना, भवानी मंदिर दुरुस्तीसाठी विशेष निधी देऊन कार्यान्वित केला आहे. मोरयाचा धोंडा येथे होत असणारे सुशोभीकरण याचा आराखडा होत असताना स्थानिक मच्छीमारांना भडकवून आपल्या जमिनी घेतील, विस्थापित करतील अशा प्रकारच्या पुढ्या सोडून हा प्रकल्प कसा होणार नाही यासाठी कोण प्रयत्न करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले सहा किल्ले पुनर्जीवित करण्याच्या साठी पालकमंत्री शासनामार्फत प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर मालवण शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाची माहिती असणारे कलादालत उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. राजकोट येथे लाईट अँड साऊंड शो होण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील असून यासाठी निलेश राणे आराखडा तयार करून घेत आहेत. असे असताना कोकणाशी संबंधित नसणाऱ्या प्रश्नांवर प्रश्न विचारून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न विरोधक एककलमी करत आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारा नेव्ही डे चा कार्यक्रम त्याचबरोबर भव्य पूर्णकृती छत्रपतींचा उभा राहणाऱ्या पुतळ्याला खाजगी जागा कशी उपलब्ध होता कामा नये यासाठी कोणी प्रयत्न केले हे जग जाहीर आहे.
धनगर वस्तीचा निधी विनायक राऊतांनी स्वतःच्या फायद्यासाठी वळवला
आम्ही खासदारांच्या विकास कामाबद्दल प्रश्न विचारले होते, त्याचे कोणतेही उत्तर न देता वेगळे उत्तर देणे हे हास्यास्पद आहे. वसंतराव तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत धनगर वस्तीत पाणीपुरवठा, रस्ते, समाजमंदिर, स्मशानभूमी यासाठी वापरला जाणारा निधी खासदार विनायक राऊत यांच्याकडून केवळ सोलार स्ट्रीट लाईटसाठी खर्च करण्यात येत आहे. रस्ते पाणी या धनगर समाजाच्या मूलभूत गरजा असताना देखील केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी यांनी आपला निधी आपल्या मर्जीतील एकाच सोलर कंपनीला ठेका दिला आहे, याची पण स्पष्टता देण्यात यावी, असे विजय केनवडेकर यांनी म्हटले आहे.