चालकाचा ताबा सुटून इनोव्हा कार पलटी

कासारटाका येथील दुर्घटना : गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापत

कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या टोयोटा इनोव्हा गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार कासारटाका पलटी झाल्याची दुर्घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कासारटाका नजीक गणपती मंदिर जवळ घडली. या अपघातात गाडीतील काही जणांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

टोयोटा इनोव्हा क्र. एमएच ०६ ए.एस. ९५८६ ही गाडी मालवण वरून कुडाळच्या दिशेने जात होती. या गाडीतून सहाजण प्रवास करत होते. गाडी कासारटाका नजीकच्या गणपती मंदिर जवळ आली असता गाडीतील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यानजीकच्या संरक्षक भिंतीला आदळून १० ते १५ मीटर अंतरावर फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला झाडीमध्ये पलटी झाली. या अपघातात गाडीतील काहींना किरकोळ दुखापत झाली. तर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीतून प्रवास करणारे सर्व प्रवासी हे कुडाळ तालुक्यातील असल्याचे समजते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!