७८ कोटींचो आकडो पेपरातच गाजलो … रस्त्यावरून जाताना खड्डोच पुढ्यात गावलो !
तारकर्ली, देवबागच्या रस्त्यावर पुन्हा बॅनर ; “एक फाडा १० लावणार, पण खड्ड्यांचं वैभव दाखवतच राहणार”
कुणाल मांजरेकर
मालवण : खड्डेमय बनलेल्या कांदळगाव रस्त्याचं चित्र बॅनरच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी समोर आणलं गेलं होतं. त्यानंतर आता आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी “बॅनर” चे प्रभावी शस्त्र होतंय की काय असा प्रश्न लागून राहिलाय. त्याला कारण ठरलेत ते तारकर्लीच्या रस्त्यावर लागलेले बॅनर ! काही दिवसांपूर्वी तारकर्लीच्या खड्डेमय रस्त्याकडे लक्ष वेधणारा एक बॅनर लावण्यात आला होता. मात्र नाराज कार्यकर्त्यांनी हा बॅनर फाडल्यानंतर पुन्हा एकदा तारकर्ली, देवबाग, वायरी आणि देवलीच्या रस्त्यावर चक्क १५ ते २० बॅनर लागले आहेत. एक फाडलात तर १० लावणार पण मालवण तारकर्ली रस्त्यावरचं खड्ड्यांचं वैभव दाखवतच राहणार असा इशारा देखील यांतील एका बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलाय. हे बॅनर सध्या लक्षवेधी ठरत आहेत.
काही दिवसांपूर्वी कांदळगावच्या रस्त्यावर बॅनर लावण्यात आला होता. या बॅनर मधून रस्त्याची दुरवस्था समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या बॅनरची जोरदार चर्चा जिल्ह्यात झाली. त्यानंतर तारकर्लीच्या रस्त्यावर देखील असाच एक बॅनर लावून खड्डेमय परिस्थितीकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र हा बॅनर कोणीतरी फाडून टाकला होता. या घटनेनंतर आज तारकर्ली, देवबाग, वायरी, देवलीच्या रस्त्यावर पुन्हा एकदा बॅनर दिसून आले आहेत.
तारकर्ली एक पर्यटन गाव की तारकर्ली एक खड्डडेमय गाव ? , “बॅनर फाडा की जाळा पण खड्ड्यातून जाताना तोंड काळं करा”, ” एक फाडलात तर १० लावणार पण मालवण तारकर्ली रस्त्यावरचं खड्ड्यांचं वैभव दाखवतच राहणार”, “७८ कोटींचो आकडो पेपरातच गाजलो रस्त्यावरून जाताना खड्डोच पुढ्यात गावलो”, “समर्थक कडवे असावेत पण हजारवेळा खड्ड्यात पडले तरी आपल्या साहेबांना समर्थन देणारे ××× नसावेत” अशा आशयाचा मजकूर सर्वत्र लावण्यात आला आहे. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.