व्हेल माशाच्या उलटी प्रकरणात मच्छीमारांना नाहक अडकवण्याचे प्रकार थांबवा ; निलेश राणेंचे सांगली पोलीसांना आवाहन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार : मच्छिमार कुटुंबाना कोणताही त्रास होऊ न देण्याची ग्वाही 

मालवण : व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मच्छिमार कुटुंबाना नाहक अडकवण्याचा प्रकार सांगली पोलिसांच्या माध्यमातून सातत्याने सुरु आहे. आम्ही मच्छिमार कुटुंबांसोबत कायम असून या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थिती मांडली जाणार आहे. कोणावरही नाहक कारवाई होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी स्पष्ट केली. 

दोन आठवड्यापूर्वी व्हेल माशाच्या उलटी संदर्भात मालवण किनारपट्टीवरून चार जणांना सांगली- मिरज पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडे व्हेल माशाची उलटी सदृश संशयितांकडून जप्त करण्यात आली असा दावा पोलिसांकडून करण्यात आला. तसेच किनारपट्टीवरील व मालवण शहरातील काही प्रतिष्ठित कुटुंबांची नावे घेऊन संशयितांची एक मोठी यादी सांगली-मिरज पोलिसांनी बनविली. काही महिलांना या प्रकरणात गुंतवून पोलीस यंत्रणा चुकीच्या प्रकारे तपास करत आहेत. संबंधित विषयात सांगली पोलीस नाहक मच्छीमार समाजाला त्रास देत असून पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने सुरू आहे. मच्छीमार समाजाला होणाऱ्या या त्रासाची गंभीर दखल भारतीय जनता पार्टीने घेतली असून याबाबत गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. मच्छिमार कुटुंबांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आम्ही मच्छिमार कुटुंबासोबत आहोत. असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होते असे सांगत कारवाई केल्या जातात. मात्र व्हेलं माशाची उलटी हा पदार्थ समुद्रातुन तरंगत किनाऱ्यावर येतो. कोणीही मच्छिमार हा पदार्थ तस्करी करून अथवा व्हेलं माश्याला इजा करून आणत नाही. काही वेळा असा पदार्थ किनारपट्टी भागात पडून असतो. जर हा पदार्थ कोणाला सापडला तर नियमानुसार ती ताब्यात घेणेबाबत नियमावली असावी. किनारपट्टी भागात राहणाऱ्या मच्छिमार कुटुंब नेहमीच शासकीय यत्रणेस सहकार्य करतात. त्यांचा वावर किनाऱ्यावर असल्याने असा कोणताही पदार्थ त्यांना मिळाल्यास त्यांना दोषी ठरवू नये. मच्छिमार बांधवांचे सहकार्य या सर्व गोष्टीत महत्वाचे असून यात मच्छिमार केंद्र स्थानी ठेवून त्याला राज मान्यता मिळावी. यासाठी भारतीय जनता पार्टी माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3835

Leave a Reply

error: Content is protected !!