अक्कलकोट येथील वटवृक्ष मंदिरात पारंपारिक पद्धतीने साजरा होणार स्वामींचा प्रकट दिन 

प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम ; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार १४६ व्या स्वामी पुण्यतिथी महोत्सव पत्रिकेचे पुजन

अक्कलकोट : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा बुधवार दि. १० एप्रिल रोजी श्री.स्वामी समर्थांच्या मुळस्थानी म्हणजेच अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. 

प्रारंभी स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या आदल्या दिवशी गुढी पाडव्यानिमीत्त हिंदू धर्म नूतन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर मंदीर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या मंत्रोच्चारात महेश इंगळे यांच्या हस्ते वटवृक्ष मंदिरातील श्रींच्या निर्गुण पादूकांस पहाटेच्या काकडआरती नंतर देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात येईल. सकाळी १०:३० वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रींच्या चरणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन व भजनसेवा कार्यक्रम पत्रिकेचे पुजन होईल. सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती प्रसंगी श्रींना गुढी पाडव्याचे गोड महानैवेद्य मंदिर समितीचे पुरोहीत मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते दाखविण्यात येईल. नैवेद्य आरतीनंतर पाडव्यानिमीत्त दर्शनाकरीता येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शीरा प्रसाद वाटप करण्यात येईल. तद्नंतर सालाबादप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान (मुळस्थान) अक्कलकोटच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन बुधवार दि. १० एप्रिल रोजी साजरा होत आहे. यादिवशी पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानचे विश्वस्त श्रीमती उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने श्रींच्या पाळण्याचे भजन होऊन दुपारी १२ वाजता श्रींच्या पाळण्यावर सत्संग महिला भजनी मंडळ व उपस्थित भाविकांच्या हस्ते गुलाल पुष्प वाहिले जाईल. त्यानंतर पाळणा, भजनगीत व आरती होवून स्वामींचा प्रकट दिन सोहळा संपन्न होईल. दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वामी समर्थांच्या या प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने ड्रायफ्रूट लाडू, बेसन लाडू, कोकोनट चिक्की, चॉकलेट कुकीज व हँडमेड चॉकलेट अशा पंचपक्वानांचा भोग लावून नंतर उपस्थित स्वामी भक्तांना हे पंचपक्वान प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे, तसेच उन्हाची तीव्रता लक्षात घेता उपस्थित स्वामी भक्तांना शीतपेयांचे वाटपही करण्यात येणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या या प्रकट दिनानिमित्त स्वामी दर्शनाकरिता येणाऱ्या स्वामीभक्तांना गर्दीमध्ये उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता मंदिराच्या दक्षिण महाद्वारा जवळील मुख्य प्रवेशद्वारा पासून मुरलीधर मंदिर समोरील गेटपर्यंत कापडी मंडप उभारण्यात आले आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी मुळ वटवृक्ष मंदिरातील स्वामी दर्शनाचा, पाळणा कार्यक्रम, भोजन महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!