निसर्गसंपन्न सिंधुदुर्ग जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा हाच माझा मानस 

तळगाव ते पत्रादेवी महामार्ग सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना आकर्षण वाटावे यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील या महामार्गाच्या टप्प्याचे सुशोभीकरण मंजूर करून घेतले. दिल्लीनंतर आपल्या जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे महामार्गाचे सुशोभीकरण होणार आहे. हा निसर्ग संपन्न जिल्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हाच यामागचा मानस आहे. कारण महामार्ग म्हणजे केवळ प्रवासाचे नव्हे तर जनतेच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायणराव राणे यांनी केले. 

महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या ‘तळगांव ते पत्रादेवी ‘ महामार्ग सुशोभीकरण कार्यक्रमाचे भूमिपूजन केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायणराव राणे यांच्या हस्ते झाराप येथे संपन्न झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना. राणे यांनी जिल्ह्याच्या विकासासंदर्भात हितगुज केले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता मुकेश साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष गुणाजी जाधव, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण,  जिल्हा सरचिटणीस संजना सावंत,संध्या तेरसे, दीपलक्ष्मी पडते, झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, तेर्से बांबर्डे सरपंच रामचंद्र परब, हुमरस सरपंच सिताराम तेली, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, राजू राऊळ, मोहन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी यांचे व आपले संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. मी राज्यात मुख्यमंत्री असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. तर आता आम्ही दोघेही केंद्रात मंत्री आहोत. अशाच एका कॅबिनेट बैठकीनंतर बाहेर पडताना मी त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग पूर्ण झाला असून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे असे सुचवले. त्यांनी याबाबत प्रस्ताव देण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही त्वरित प्रस्ताव सादर केला व त्या प्रस्तावाला त्यांनीही लगेचच मान्यता दिली.दोन दिवसांपूर्वीच त्यांना भेटून या कामाला मंजुरीही घेतली. त्यामुळेच आता हे काम जलद गतीने पूर्ण होणार असून जिल्ह्याला एक नवे रूप प्राप्त होणार आहे यासाठी मी नितीन गडकरी यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

मुंबई गोवा महामार्ग अन्य जिल्ह्यात रखडलेला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र त्याचे काम आम्ही त्वरित पूर्ण करून घेतले. मात्र येथील लोकांना त्याचे अप्रूप वाटत नाही. ‘केल्यानी तर काय झाला ‘अशीच मानसिकता येथील लोकांची आहे. महामार्गाचे फार मोठे महत्त्व आहे.महामार्गामुळे वेळेची बचत होईल. मात्र बचत झालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा. उद्या तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायातील उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी महामार्गाचे फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळे मानसिकता बदला व विकासाला साथ द्या असेही त्यांनी सांगितले. 

मी महसूल मंत्री असताना सावंतवाडीतील शासकीय सिंधू महोत्सव कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. त्यानंतर या जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले त्यातील काही मार्गी लागले तर काहींना विरोध झाला. सी वर्ल्ड, डिस्नेलँड या सारख्या प्रकल्पांना विरोध झाला. मालवण येथील ज्या भागात शेती होत नाही साधे गवतही उगवत नाही अशा भागात सी वर्ल्डसाठी भूसंपादन होत असताना त्याला विरोध केला गेला. मालवणी येथेच माळरानावर डिस्नेलँड सारखा प्रकल्प होणार होता. तत्कालीन सचिव अरुण बोंगिरवार यांची या प्रकल्पासाठी नेमणूक केली होती. मात्र भूसंपादनाला विरोध झाल्याने तोही प्रकल्प रखडला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर रोषणाई करायची होती. मात्र, येथील लोकांची मानसिकता नसल्याने अनेक प्रकल्प मार्गी लागले नाहीत. ते मार्गे लागले असते तर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न चार लाखाहून अधिक झाले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

आपल्याकडे केवळ विरोधासाठी विरोध हीच मानसिकता आहे. आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला कोणीही विरोधक उपस्थित राहिले नाहीत. कारण त्यांना विकासाचा दृष्टिकोन नाही. ते कोणताही विकास करू शकले नाहीत. साधी बालवाडी, रस्ता किंवा पूलही ते बांधू शकले नाहीत. त्यामुळे भविष्यात या महामार्गावरून फिरताना किमान नारायणाचं म्हणजे देवाचं नाव तरी घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला. 

सुशोभीकरणाच्या प्रत्येक कामाचे डिझाईन मला दाखवूनच फायनल करा : अधिकाऱ्यांना सूचना 

तळगाव ते पत्रादेवी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या टप्प्याचे सुशोभीकरण होत आहे. या कामात जिल्ह्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर आकर्षक अशा कमानी होणार आहेत. या स्वागताच्या कमानीवर हत्तींच्या प्रतिमा असाव्यात कारण अतिना आपण गणपतीचे स्वरूप मानतो. तसेच विविध ठिकाणी सिंधुदुर्गात आढळणारे विविध प्राणी पक्षी यांच्या प्रतिमा उभारण्यात याव्यात. या महामार्गाच्या दुभाजकावर तसेच रस्त्याच्या बाजूला उन्हात व पावसात बारा महिने टिकतील अशीच पण आकर्षक झाडे लावण्यात यावीत. त्याचबरोबर या सुशोभीकरण कामाची प्रत्येक डिझाईन मला दाखवूनच ती फायनल करण्यात यावी अशा सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांना केल्या. तुमच्या नावात लक्ष्मी आहे त्यामुळे पैशांची काळजी करू नका आवश्यक असलेला सर्व निधी पुरविला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचा पायगुण चांगला म्हणजेच त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे सांगातानाच पत्रकारांनीही चांगल्या कामाचं जनमानसात प्रबोधन करावं असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकारात्मक दृष्टिकोनामुळेच जिल्ह्याचा विकास शक्य : जिल्हाधिकारी किशोर तावडे 

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असतात. मी ज्यावेळी जिल्ह्यात रुजू झालो त्यावेळी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपल्याला गोवा व खारेपाटण या जिल्ह्याच्या हद्दींवर आकर्षक अशा कमानी उभारायच्या आहेत असे सुचवले होते. त्यानंतर काही काळातच त्यांनी या प्रकल्पाला मंजुरीही दिली. जिल्ह्याच्या विकासाबाबत तळमळ  सकारात्मक मानसिकतेमुळेच हे शक्य आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कौतुक केले. 

दरम्यान, गोवा व खारेपाटण येथे होणाऱ्या स्वागत कमानीवर जिल्ह्यातील कवी लेखक साहित्यिक व अन्य महनीय व्यक्तींची माहिती तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती असावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना केली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी तळगाव ते पत्रादेवी या टप्प्याच्या सुशोभीकरण कामाबाबत विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी स्वागत लक्ष्मीकांत जाधव तर आभार मोहन सावंत यांनी मानले. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!