केंद्रीयमंत्री नारायण राणे हे कोकणच्या भल्यासाठी झटणारे नेतृत्व
माजी खासदार निलेश राणे यांचे प्रतिपादन ; कोकणच्या विकासासाठी त्यांनी कधीही परिणामांची पर्वा केली नाही
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाचे सुशोभीकरण करणार असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ओरोसमधील कार्यक्रमात सांगितले होते. त्यानंतर त्वरित त्यांनी या कामाला मंजुरीही मिळवून दिली. यापूर्वीही जिल्ह्यात सी वर्ल्ड, रेडी पोर्ट, चिपी एअरपोर्टसारखे अनेक प्रकल्प त्यांनी आणले. कारण ते व्हिजन असलेले नेते आहेत. परिणामांची पर्वा ते करत नाहीत. केवळ कोकणचं भलं व्हावं यासाठी झटणारे ते नेतृत्व आहे, असे गौरवोद्गार भाजपचे कुडाळ मालवण विधानसभाप्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.
मुंबई गोवा महामार्गाच्या तळगाव ते पत्रादेवी टप्प्याच्या सुशोभीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. ज्यावेळी आपण खासदार होतो व नारायण राणे हे पालकमंत्री होते. त्यावेळी महामार्ग प्राधिकरण खातं हे सी.पी.जोशींकडे होते. त्यावेळी साहेबांच्या प्रयत्नातून झाराप ते पत्रादेवी महामार्गासाठी २७४ कोटींचे वाढीव इस्टिमेट मंजूर करून घेतले. रायगड रत्नागिरीमध्ये रखडलेला महामार्ग सिंधुदुर्गात पूर्णत्वास आला तो राणेसाहेबांमुळेच. या जिल्ह्यातही महामार्गाचे काम सुरू असताना अनेक अडचणी आल्या. मात्र हा जिल्हा राणेसाहेबांचा असल्यामुळेच येथील काम वेळेत पूर्ण झाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणात जैतापूर सारखा प्रकल्प व्हावा यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. हा प्रकल्प झाला असता तर अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला असता, कोट्यावधींची उलाढाल झाली असती. त्यांनी त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. त्यावेळीही लोकसभेची निवडणूक तोंडावर होती. मी निवडणुकीला उमेदवार होतो. मात्र त्यांनी कधीही मतांचा विचार केला नाही. त्यांनी नेहमीच कोकणी माणसाचे हित पाहिले, असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
चिपी एअरपोर्ट राणेसाहेबांमुळेच जिल्ह्यात आला. आज त्याचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करोत. सी वर्ल्ड, रेडी पोर्ट, डिस्नेलँड, एम आय डी सी यासारख्या प्रकल्पांना विरोध झाला. हे सर्व प्रकल्प मार्गी लागले असते तर सिंधुदुर्गचा चेहरा मोहरा बदलला असता. केवळ विरोधासाठी विरोध योग्य नाही. कारण प्रकल्प आणणे तेवढे सोपे नाही. ज्यांचं वजन आहे ज्यांचं नाव आहे व ज्यांचं चालतं तेच हे करू शकतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.