माड तोडण्याच्या वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी दांडी मोरेश्वरवाडीतील पाच जणांची निर्दोष मुक्तता
संशयितांच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड. सुमित जाधव, ॲड. समृद्धी आसोलकर यांचा युक्तिवाद
मालवण | कुणाल मांजरेकर
सामाईक जमिनीतील माड तोडण्याच्या वादातून झालेल्या धक्काबुक्की आणि मारहाण प्रकरणातील पाच जणांची मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. महेश देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींच्या वतीने ॲड. रुपेश परुळेकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड. सुमित जाधव, ॲड. समृद्धी आसोलकर यांनी युक्तिवाद केला. ही घटना १२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजता घडली होती. आरोपींमध्ये सुंदर सदाशिव चांदेरकर, सुशांत सदाशिव चांदेरकर, समीक्षा सुंदर चांदेरकर, भाग्यश्री दीपक ढोके आणि ज्योती दीपक ढोके (सर्व रा. दांडी मोरेश्वरवाडी, ता. मालवण) यांचा समावेश होता.
याबाबत फिर्यादी रुपाली रविद्र चांदेरकर (वय-४५, रा. दांडी मोरेश्वरवाडी ता. मालवण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्यात आणि त्यांचे सावत्र दिर सुंदर सदाशिव चांदेरकर यांच्यात जमीन जागेच्या कारणावरून वाद विवाद आहेत. १२ एप्रिल २०२१ ला सामाईक जमिनीत असलेला माड तोडण्यासाठी सुंदर सदाशिव चांदेरकर हा कामगार विश्वनाथ तोडणकर याला घेवून आला. तेव्हा तेथे सुंदर सदाशिव चांदेरकर व त्यांचे घरातील लोक उपस्थित होते. तेव्हा फिर्यादी यांनी माड तोडण्यासाठी आलेला विश्वनाथ तोडणकर याला तु कोणाला विचारून माड तोडत आहेस असे विचारले असता तेथे उपस्थित असलेले सुंदर चांदेरकर याने विश्वनाथ याला मी माड तोडण्याकरीता बोलाविले आहे तो माझे आदेशाने माड तोडत आहे त्याने जर तो माड तोडला नाही तर तो माड मी तोडणार तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी दिली. तेव्हा आपले दिर यशवंत सदाशिव चांदेरकर यांना आपण बोलावून आणले. त्यावेळी सुंदर चांदेरकर व फिर्यादित शाब्दीक बाचाबाची झाली तेव्हा सुंदर चांदेरकर व सुशांत चांदेरकर यांनी यशवंत यांना शिवीगाळी करून धमकी दिली, तेव्हा सदर ठीकाणी हजर असलेली सुंदर चांदेरकर यांची पत्नी समिक्षा ही बाचाबाची करू लागली. तेव्हा त्यांची मुलगी जागृती हिने समिक्षा हिला तु पूरुषांमध्ये बोलु नकोस असे सांगितले असता समिक्षा हिने फिर्यादी ची मुलगी जागृती रविद्र चांदेरकर हिचे केसांना हाताने पकडून धकलुन दिले व हाताच्या थापटाने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी मुलीला सोडविण्यासाठी गेल्या असता तेथे उपस्थित असलेली भाग्यश्री दिपक ढोके हिने त्यांचे केसांना हाताने ओढुन पाठीवर हाताच्या थापटाने मारहाण केली, सदर ठीकाणी हजर असलेली ज्योती दिपक ढोके हिने फिर्यादीचे उजव्या हाताला पकडून दंडाला चावा घेवून दुखापत केली व एका बाल गुन्हेगाराने यशवंत सदाशिव चांदेरकर यांना हाताच्या थापटाने पाठीवर मारहाण केली. त्यामुळे फिर्यादी रुपाली चांदेरकर यांनी सुंदर सदाशिव चांदेरकर, सुशांत सदाशिव चांदेरकर, समिक्षा सुंदर चांदेरकर, भाग्यश्री दिपक ढोके, ज्योती दिपक ढोके व एका बाल गुन्हेगाराच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणी झालेल्या सुनावणीत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.