केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले दिवंगत मनोहर जोशींच्या पार्थिवाचे दर्शन
सरांच्या जाण्यामुळे साहेबांच्या शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासाचा साक्षीदार पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आज निधन झाले. यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. तसेच त्यांच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, देशाच्या लोकसभेचे माजी अध्यक्ष, शिवसेना नेते, प्रिंसिपल मनोहर जोशी यांचे निधन दु:खदायक आहे. शिवसेनेच्या स्थापने पासून आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे सहकारी, शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते अशी त्यांची ओळख होती. मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक पदापासून देशाच्या सर्वोच्च संसदेच्या अध्यक्ष पदापर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख चढता राहिला. जोशी सरांनी राजकारणासोबतच उद्योग व्यवसायामध्ये चांगला जम बसविला होता. त्यांच्या कोहिनूर उद्योग समुहाचे नाव आजही प्रसिध्द आहे. मराठी मुलांना व्यावसायिक कौशल्य शिकविण्याचे त्यांचे वर्ग प्रसिध्द होते. सरांच्या जाण्यामुळे साहेबांच्या शिवसेनेच्या सुरुवातीपासूनच्या इतिहासाचा साक्षीदार पडद्याआड झाला. ईश्वर सरांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख झेलण्याची शक्ती देवो अशी माझी प्रार्थना आहे, अशी प्रतिक्रिया ना. राणे यांनी व्यक्त केली आहे