शिवसेनेचा कोहिनुर हरपला !

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले. हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. त्यानंतर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या बुलढाणा आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत. मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3288

Leave a Reply

error: Content is protected !!