विविधांगी कार्यक्रमांनी साजरा झाला कुंभारमाठचा माघी गणेशोत्सव ; संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून आयोजन

संगीत भजने, दशावतार, रेकॉर्ड डान्स, रक्तदान शिबिरासह सातही दिवस महाप्रसाद ; हजारो भाविकांनी घेतला लाभ 

संदीप लोके विरुद्ध गुंडू सावंत बुवा यांच्यातील डबलबारी आणि भजनसम्राट भगवान लोकरे बुवांच्या भजनाने श्रोते मंत्रमुग्ध 

मालवण | कुणाल मांजरेकर

भाजपचे स्थानिक नेते संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून रेकोबा मित्रमंडळाच्या वतीने सलग १४ व्या वर्षी कुंभारमाठ सिद्धिविनायक पटांगणावर आयोजित करण्यात आलेला माघी गणेशोत्सव विविधांगी कार्यक्रमांनी सात दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त संगीत भजने, भजनबारी, दशावतार, रेकॉर्ड डान्स, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सातही दिवस महाप्रसाद ठेवण्यात आला होता. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. शेवटच्या दिवशी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या सौजन्याने भजन सम्राट भगवान लोकरे बुवा यांचे भजन आयोजित करण्यात आले होते. या सुश्राव्य भजनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.

रेकोबा मित्रमंडळाच्या वतीने कुंभारमाठ येथील सिद्धिविनायक पटांगणावर साजरा होणारा माघी गणेशोत्सव जिल्ह्यातील नावाजलेला उत्सव म्हणून ओळखला जातो. या उत्सवानिमित्त दरवर्षी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी ते सोमवार दि. १९ फेब्रुवारी या कालावधीत सात दिवस हा माघी गणेशोत्सव संपन्न झाला. सोमवारी १२ फेब्रुवारीला सायंकाळी चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा ट्रिक सीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग “उध्दार झाला वारुळाचा अर्थात नागपंचमी” संपन्न झाला. तर दुसऱ्या दिवशी बाळकृष्ण गोरे पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळ कुडाळ यांचा “भेद शिवपिंडीचा जन्म कालरात्रीचा अर्थात मृत्यू रुद्राणी” हा ट्रिक सीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला. 

१६ फेब्रुवारी रोजी याठिकाणी हळदी कुंकू समारंभ घेण्यात आला. तर रात्री दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ यांचा “पुत्र भक्षिती मांस आईचे निर्माण वृषचिक राशीचे” हा ट्रिक सीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला. 

रविवारी १८ फेब्रुवारी रोजी याठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. तर रात्री श्री देवी प्रासादिक भजन मंडळ, देवगड (बुवा संदीप लोके, पखवाज योगेश सामंत) विरुद्ध श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ कुडाळ (बुवा गुंडू सावंत, पखवाज विराज बावकर) यांच्यात जंगी भजनबारी सामना आयोजित करण्यात आला होता. याला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या सौजन्याने भजन सम्राट भगवान लोकरे बुवा यांचे भजन आयोजित करण्यात आले होते. तर सायंकाळी श्रींची विसर्जन मिरवणूक संपन्न झाली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3837

Leave a Reply

error: Content is protected !!